सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे हेलिपॅडने जोडणार
By admin | Published: May 20, 2015 01:49 AM2015-05-20T01:49:24+5:302015-05-20T01:49:24+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी हेलिपॅड प्रस्तावित केली
अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील नऊ ठिकाणी हेलिपॅड प्रस्तावित केली असून, आणखी काही जागेच्या शोधात आहे. ही सर्व हेलिपॅड महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर करण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा होऊन १७ वर्षे झाली; पण या जिल्ह्यात पर्यटन स्थळांच्या विकासासाठी ठोस भूमिका घेण्यात आली नाही. मात्र युती सरकारने सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला प्राधान्य दिले आहे. केंद्र सरकारने जिल्ह्णातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळे सध्या युद्धपातळीवर पर्यटनस्थळे शोधण्यात येत आहेत. या नऊ जागांचे प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केले असून, हे प्रस्ताव राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. केंंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्षात या कामाला सुरुवात होणार आहे. बांधकाम विभाग या नऊ जागांव्यतिरिक्त आणखी काही जागा घेण्यास तयार असून, सर्व पर्यटनस्थळे हेलिपॅडने जोडली, तर एखाद्या उद्योजकाला किंवा पर्यटकाला सिंधुदुर्गमध्ये हेलिकॉप्टरने आल्यास अनेक फायदे होणार आहेत.
येथे होणार हेलिपॅड...
जिल्ह्यातील शिरोडा, आंबोली, सावंतवाडी, मिठबाव, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले, तिलारी आदी ठिकाणी हेलिपॅड होणार असून, प्रत्येक हेलिपॅडसाठी एक एकर जागा संपादित केली जाईल.
अद्याप प्रस्ताव नाही
हेलिपॅडचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या करीत असून, सद्य:स्थितीत नऊ प्रस्ताव तयार झाले आहेत. खासगी व्यक्तींनी पुढे येऊन आपली जागा दिल्यास त्यात हेलिपॅड तयार करण्यात येणार असून, अद्यापएकही तसा प्रस्ताव आला नाही़
- प्रकाश शिंदे,
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग़