डरोगे तो मरोगे... धाडसी चिमुकल्यांचा संदेश
By admin | Published: July 19, 2016 05:20 AM2016-07-19T05:20:07+5:302016-07-19T05:20:07+5:30
चोराला पकडून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या मॅथ्यू सुधाकर नाडार (११) आणि विन्सी सुधाकर नाडार (१५) यांचा पोलीस उपायुक्तांकडून सत्कार करण्यात आला.
मुंबई : बहिणीचा मोबाइल हिसकावून पळ काढत असलेल्या चोराला पकडून त्याच्याशी दोन हात करणाऱ्या मॅथ्यू सुधाकर नाडार (११) आणि विन्सी सुधाकर नाडार (१५) यांचा पोलीस उपायुक्तांकडून सत्कार करण्यात आला. या वेळी आपली भीती हा आपला सर्वात पहिला शत्रू असतो. त्यामुळे जर ही भीतीच नसेल, तर आपण काहीही करू शकतो. त्यामुळे ‘डरोगे तो मरोगे’ असा संदेश या चिमुकल्यांनी दिला.
अँटॉप हिल परिसरात राहाणारा मॅथ्यू हा सहावी इयत्तेत तर विन्सी दहावी इयत्तेत शिक्षण घेतात. रविवारी सकाळी प्रार्थनेसाठी चर्चकडे जात असताना एका लुटारूने विन्सीचा मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिवाची पर्वा न करता, या चिमुरड्याने चोराशी दोन हात केले. मॅथ्यूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, ‘बहिणीसोबत जात असताना अचानक एक मद्यपी बहिणीकडे येत असताना दिसला. मी थेट तिच्या पुढे उभे राहून तिला आधार दिला. त्यानंतर, चोर माझ्या बहिणीच्या हातातील मोबाइल हिसकावत होता. मी रागाने माझ्या हातातील छत्रीने त्याला मारझोड करत बहिणीचा मोबाइल परत मिळविला,’ असे त्याने सांगितले. विन्सीच्या म्हणण्यानुसार, ‘आपल्या मनातली भीती हा आपला खरा शत्रू असतो. माझ्या मम्मी-पप्पाने मला नेहमीच न घाबरता प्रत्येक परिस्थितीशी झगडायचे, कसे हे शिकविले. शाळेतही सेल्फ डिफेन्सचे धडे देतात. त्यामुळे चोर अंगावर येणार हे समजताच आम्ही त्याच्याशी सामना केला. साधारण पाच ते दहा मिनिटे आमच्यात झटापट सुरू होती. अचानक समोरून आलेल्या टॅक्सीचालकाचे लक्ष जाताच त्याने आम्हाला मदत केली. लहान असलो म्हणून काय झाले? आम्हीही कुणापेक्षा कमी नाही,’ असे म्हणत तिने ‘सर्वांनी मनातली भीती दूर करत काम केल्यास सर्व गोष्टी साध्य होऊ शकतात,’असे सांगितले. आज माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडून दोघा चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
>माटुंगा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांकडून दोघा चिमुकल्यांचा सत्कार करण्यात आला तर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीही सोशल मिडीयावरून कौतुक केले.