मंत्रिपदासाठी नरके-हाळवणकरांची फिल्डिंग
By admin | Published: October 21, 2014 12:41 AM2014-10-21T00:41:41+5:302014-10-21T00:41:54+5:30
भाजप-शिवसेना यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
कोल्हापूर : राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेशिवाय भाजपचे सरकार आले तर मंत्रिपदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर भाजप-शिवसेना यांचे संयुक्त सरकार स्थापन होण्याची शक्यता गृहित धरून शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्हा या दोन पक्षांच्या मागे ठामपणे राहिल्याने आगामी मंत्रिमंडळात जिल्ह्याला संधी मिळणार हे निश्चित आहे. मात्र सरकार कोणाचे येते; केवळ भाजपचे की पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे यावरच मंत्रीपद कुणाला मिळणार हे अवलंबून असेल.
शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याइतपत संख्याबळ मिळविण्यात भाजपने यश मिळविल्यास या पक्षाचे राज्यातील पहिले सरकार सत्तेवर येईल. या सरकारमध्ये मंत्री कोणकोण असणार याची अटकळबाजी आता चालू झाली आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणीही चालू केली आहे. त्यातच सुरेश हाळवणकर यांचाही समावेश आहे. याशिवाय चंद्रकांतदादा पाटील यांचेही नाव चर्चेत येत आहे.
शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यास मंत्रिपदाची संधी शिवसेनलाही मिळू शकते. ही शक्यता लक्षात घेवून चंद्रदीप नरके यांनीही मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)