हॅलो १०८, चार वर्षांत रुग्णांमध्ये पाच पट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 04:17 PM2018-10-12T16:17:44+5:302018-10-12T17:31:41+5:30
राज्याच्या आरोग्य विभागाने २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनापासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत ‘१०८’ ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली.
पुणे : अपघात असो की हृदयविकाराचा झटका, भोवळ असो गर्भवती महिलेला त्रास... अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत ‘१०८’ ही रुग्णवाहिका राज्यभरातील रुग्णांच्या सेवेला धावून जात आहे. जानेवारी २०१४ पासून आतापर्यंत ३३ लाख रुग्णांना या सेवेने आधार दिला आहे. त्यामुळे वर्षागणिक या सेवेला नागरिकांचा प्रतिसाद वेगाने वाढत चालला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने २०१४ मध्ये प्रजासत्ताक दिनापासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत ‘१०८’ ही मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. राज्यात एकूण ९३७ रुग्णवाहिका असून त्यामार्फत २४ तास अखंडित सेवा दिली जात आहे. यापैकी ८२ रुग्णवाहिका पुणे जिल्ह्यात आहेत. बी. व्ही. जी. इंडिया या कंपनी मार्फत ही सेवा पुरविली जात आहे. गेल्या साडेचार वर्षात वाहन अपघात, मोठे अपघात, दुखापती, मारहाण, उंचावरून पडणे, भाजणे, हृदयविकाराचा झटका, विषबाधा, गर्भवती प्रसूती, विद्युत झटका अशा कोणत्याही आपत्कालीन स्थितीत १०८ रुग्णवाहिका अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहचली आहे. रुग्णवाहिकेत २४ तास प्रशिक्षित डॉक्टर व चालक असतात. त्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३,२७,७२४ रुग्णांना या सेवेने आधार दिला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, नागपुर, सोलापुर, औरंगाबाद या जिल्हांत या सेवेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. मागील साडे चार वर्षात सेवेला मिळणारा प्रतिसाद दिवसागणिक वाढतच चालला आहे. २०१४ मध्ये सुमारे १ लाख ९२ हजार रुग्णांना या सेवेमुळे जीवनदान मिळाले. हा आकडा दि. ११ आॅक्टोबर २०१८ पर्यंत तब्बल १२ लाखांच्याही पुढे गेला आहे. साडे चार वर्षांत तब्बल ३२ लाख ९७ हजार रुग्णांना ‘१०८’ची साथ मिळाली.
----------------
काही जिल्ह्यांतील मागील चार वर्षातील रुग्णांची स्थिती
जिल्हा २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ (सप्टेंबरअखेरपर्यंत)
पुणे १३,९०७ २७,१९७ ७७,२१४ ८८,८१७ १,२०,५८९
मुंबई १६,१३७ २७,२१७ ३५,०२७ ३७,०६२ ७३,३५९
नागपुर ७,४०३ १७,१०६ २६,६७५ २९,१९३ ६०,७८२
सोलापूर ८,७८९ १५,५१९ ६२,०३४ ६६,६२९ ५९,०९९
औरंगाबाद ९,०२२ १५,६३७ २७,२९९ ३३,७८५ ४६,५४०
---------------------
जानेवारी २०१४ पासून ११ आॅक्टोबरपर्यंतचे एकुण रुग्ण-
वर्ष एकुण रुग्णसंख्या
२०१४ १,९२,०४५
२०१५ ४,०१,३११
२०१६ ६,८४,५६०
२०१७ ७,९८,२५१
२०१८ १२,२१,५१३
(दि. ११ आॅक्टो.)
एकुण ३२,९७,६८०
------------------------------
रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न केला आहे. गेल्या साडेचार वर्षामध्ये आषाढी वारी ,गणेशोत्सव, मॅरेथॉन, नवरात्री उत्सव यांसह विविध मोठ्या उत्सवांमध्ये पूर्वनियोजन करून वैयकीय सेवा दिली. नागरिकांकडून या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
- विठ्ठल बोडखे, विभागीय व्यवस्थापक
-------------
गर्भवती महिलांना होणारा त्रास, प्रसुती यासाठी १०८ रुग्णवाहिकेचा खुप फायदा होत आहे. मागील साडे चार वर्षात ७ लाख ४४ हजार २२३ गर्भवती महिलांना सेवा देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ २ लाख ७० हजार रुग्णांना विविध अपघातांच्या ठिकाणी सेवा देण्यात आली. विषबाधेच्या घटनांमध्येही सुमारे ९८ हजार रुग्णांना या रुग्णवाहिकांमधून सेवा पुरविण्यात आली.
आपत्कालीन स्थितीत सेवा (जानेवारी २०१४ ते जुन २०१८ अखेरपर्यंत)
वैद्यकीय - १३,२३,७४६
गर्भवती महिला - ७,४४,२२३
वाहन अपघात - २,७०,८३३
विषबाधा - ९७,८८५
...........