हॅलो, हॅलो...माझे नाव मतदार यादीत आहे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 08:24 PM2019-03-15T20:24:38+5:302019-03-15T20:26:03+5:30
तक्रार नोंदविण्यासाठी आयोगाने उपलब्ध केला ‘टोल फ्री क्रमांक १९५०’
औरंगाबाद : निवडणूक आयोगाने तक्रारी नोंदविता याव्यात, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावरून सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे, तो म्हणजे हॅलो...सर माझे नाव मतदार यादीमध्ये आहे ना. नाव असल्याचे समजल्यानंतरच समोरील व्यक्ती फोनवरील संभाषण बंद करीत असल्याचा अनुभव निवडणूक विभागाला येत आहे.
अजून आचारसंहितेचा पारा चढला नसल्यामुळे मागील दीड महिन्यात निवडणूक आणि मतदानासंबंधी एकही तक्रार आली नसून वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी या टोल फ्री क्रमांकाचा वापर होत आहे. मतदार यादीत नाव असण्याबाबतचा प्रश्न सर्वाधिक वेळा विचारला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांच्या तक्रारींसाठी २५ जानेवारीपासून १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासाठी एक पथक गठीत करण्यात आले आहे. कोणाचे नाव यादीत आले आहे की नाही, अर्जात काय उणिवा राहिल्या आहेत, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी काय करावे लागेल, कोठे अर्ज भरावा लागेल, अर्जासोबत काय कागदपत्रे जोडावी लागतील. हे आयोगाने वेळोवेळी जाहीर केले असले तरी टोल फ्री क्रमांक दिला. आजवर त्या क्रमांकावर १२४८ कॉल्स आल्याची नोंद झाली आहे.
रोज ४० ते ४५ कॉल्स
फोन करणारे स्वत:चे नाव मतदार यादीमध्ये आहे का, कोणत्या मतदारसंघातील यादीमध्ये आहे. नावात बदल करायचा असल्यास काय करावे लागेल, आता नाव नोंदले तर यावेळी मला मतदान करता येईल का, अशाच प्रकारच्या प्रश्नांचा भडिमार मतदारांकडून केला जात आहे. रोज ४० ते ४५ कॉल्स प्राप्त होत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
व्हीव्हीपॅटचा डेमो २१ कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना
जिल्ह्यातील एक हजारांवर अधिकारी, कर्मचारी आणि कामगार असलेल्या २१ कंपन्यांमध्ये निवडणूक विभाग व्होटर व्हेरिफीयेबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) या मशीनचा डेमो देणार आहे. गुरुवारपासून या तीनदिवसीय मोहिमेस सुरुवात झाली. ४जिल्ह्यात २ लाख ५० हजारांवर नागरिकांनी व्हीव्हीपॅटच्या डेमोमध्ये सहभाग घेतला. यापैकी १ लाख ८० हजार जणांनी प्रत्यक्ष मतदानाचा डेमो करून बघितला. जिल्ह्यातील एक हजारांवर कर्मचारी असलेल्या २१ कंपन्यांतून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना व्हीव्हीपॅट मशीनचा डेमो दिला जाणार आहे. यासाठी विशेष पथकांचीही नेमणूक केली आहे. ४शनिवारी या तीनदिवसीय मोहिमेचा समारोप केला जाईल. कंपन्यांतून कामगारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाबद्दल जागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. २१ कंपन्यांतील कर्मचारी, कामगारांना प्रशिक्षण, डेमो देण्याबरोबरच मतदानाची शपथही दिली जाणार आहे. मतदान करण्यासंंबंधीचे संकल्प पत्रही भरवून घेतले जाणार आहे.