सलाम ! शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक सैन्यात रुजू, अंत्यविधीवेळी घेतलेली शपथ केली पुर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 11:26 AM2017-09-09T11:26:24+5:302017-09-09T13:42:04+5:30
शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच स्वाती महाडिक यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.
चेन्नई, दि. 9 - जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात रुजू झाल्या आहेत. शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच त्यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.
वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत उपस्थित होती. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे.
17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला.
Chennai: Visuals of passing out parade at The Officers Training Academy pic.twitter.com/hAbQEDNHjc
— ANI (@ANI) September 9, 2017
शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्या आता सैन्यदलात रूजू झाल्या आहेत.
स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली होती.
His(Col Mahadik) first love was his uniform and his unit, so I just had to wear this: Lt. Swati Mahadik pic.twitter.com/iuxogmmaEF
— ANI (@ANI) September 9, 2017
प्रशिक्षणात अव्वल...-
‘सैन्यात भरती होणं,’ या एकाच उद्देशाने झपाटून गेलेल्या स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून मिळालेलं पदक कुटुंबीयांना दाखविताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
चेन्नईत खडतर प्रशिक्षण
देशसेवेसाठी संधी मिळण्यासाठी स्वाती महाडिक यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत एक वर्ष अथक प्रयत्न केले. चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान 10 वर्षांनी लहान होते. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागलं.