दुचाकी खरेदी करताना हेल्मेटची सक्ती
By admin | Published: March 3, 2016 04:30 AM2016-03-03T04:30:42+5:302016-03-03T04:30:42+5:30
विनाहेल्मेट प्रवास करून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे परिवहन विभागाकडून नुकताच हेल्मेटच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली.
मुंबई : विनाहेल्मेट प्रवास करून नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. त्यामुळे परिवहन विभागाकडून नुकताच हेल्मेटच्या सक्तीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. वाहन विक्रेत्यांनी दुचाकी वाहन विकतेवेळी खरेदीदारास दोन हेल्मेट पुरविण्याविषयीचेही निर्देश देण्यात आले. मात्र, त्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने, अखेर दुचाकी वाहन उत्पादक आणि हेल्मेट उत्पादक यांची बुधवारी बैठक घेण्यात आली आणि यात दुचाकी खरेदी करताना, हेल्मेट सक्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२९ नुसार दुचाकीस्वार चालकाबरोबरच त्याच्या मागे बसून प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाही परिवहन विभागाकडून हेल्मेटची सक्ती करतानाच, त्याबाबतचा २00३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा दाखलाही परिवहन विभागाकडून देण्यात आला. त्यानंतर दुचाकीस्वारांविरोधात कारवाईदेखील सुरू झाली.
उत्पादकांमार्फत त्यांच्या राज्यातील सर्व वाहन विक्रेत्यांनी वाहन विक्रीच्या वेळेस ग्राहकांस दोन हेल्मेट पुरविण्याविषयी निर्देश परिवहन विभागाकडून देण्यात आले होते, तसेच वाहन नोंदणी करताना सादर केलेल्या कागदपत्रात, वाहनासोबत दोन हेल्मेट पुरविण्यात आल्याचे नमूद असल्याची खातरजमा करण्यासही आरटीओंना सांगितले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे समोर आले.
बुधवारी याबाबत वान्द्रे येथील परिवहन आयुक्त कार्यालयात हेल्मेट उत्पादक आणि दुचाकी वाहन उत्पादकांची बैठक पार पडली. या बैठकीत दुचाकी वाहन उत्पादकांना वाहनाची विक्री करताना ग्राहकास हेल्मेट विकण्याविषयी केंद्रीय
मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये असणाऱ्या तरतुदींचे कसोशीने पालन करण्यास सूचित केल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)