‘टिंगलटवाळी सोडून शेतकऱ्यांना मदत करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 08:24 AM2020-10-22T08:24:19+5:302020-10-22T08:25:10+5:30
फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
परभणी/जालना : अतिवृष्टीने शेती व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असताना सरकारकडून कोणतीही मदत नाही, पंचनामे होत नाहीत. मीडियासमोर टिंगलटवाली करण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्यावर लक्ष द्यावे, अशा भाषेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फटकारले.
फडणवीस बुधवारी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर व्यथा मांडल्या. यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्रीही वसमत तालुक्यात आले नाहीत, सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्यच नाही. बोलणारेच जास्त झालेत, निर्णय घेणारे कोणी राहिले नाहीत. असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्यासमवेत माजी मंत्री पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, आ. मेघना बोर्डीकर आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यात शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून, बांधावर पाहणी करण्याची ही वेळ नाही. तेव्हा शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस झाले भावनिक
फडणवीस सिंधी काळेगाव येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने हातात मूग आणि सोयाबीन आणले. त्या पिकांची स्थिती पाहून फडणवीस भावनिक झाले. परंतु लगेच सावरत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू असे आश्वासन त्यांनी दिले.