महिलांहून पुरुषच अधिक करतात ज्येष्ठांचा छळ! हेल्पेज इंडियाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 05:38 AM2018-06-15T05:38:35+5:302018-06-15T05:38:35+5:30
महिलांहून पुरुषच ज्येष्ठांचा अधिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती हेल्पेज इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेने ही माहिती दिली.
मुंबई : महिलांहून पुरुषच ज्येष्ठांचा अधिक छळ करत असल्याची धक्कादायक माहिती हेल्पेज इंडियाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेने ही माहिती दिली. १५ जून रोजी असलेल्या जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त संस्थेने २३ शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती मिळाल्याचे या वेळी सांगण्यात आले मँगलोर, भोपाळ, अमृतरसर, दिल्ली, कानपूर या शहरांत ज्येष्ठांचा सर्वाधिक छळ होत असल्याचा
दावा संस्थेने सर्वेक्षणात केला आहे. त्यात देशभरात ज्या ज्येष्ठांचा छळ होत असल्याची माहिती मिळाली आहे, त्यात ८२ टक्के ज्येष्ठांनी
केवळ कुटुंबाची बदनामी होऊ नये, म्हणून छळ होत असतानाही तक्रार केली नसल्याचे सांगितले आहे. धक्कादायक बाब म्हणजे
आई-वडिलांचा छळ करण्यात मुले आणि जावई अशा पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचेही सर्वेक्षणात समोर आल्याचे संस्थेचे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले.
बोरगावकर म्हणाले, छळ करणाऱ्या पुरुषांत ५२ टक्के पुरुष मुलगा, तर ३४ टक्के जावयांचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारे ज्येष्ठांचा छळ होत असल्याचेही यामध्ये दिसते. त्यात आदर न करणे, गलिच्छ भाषा वापरणे, दुर्लक्ष करणे अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांहून अशा प्रकारे छळ होत असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले.
जनजागृती व समुपदेशन हाच उपाय!
ज्येष्ठांमध्ये हेल्पलाइन व तक्रार करण्याबाबतची जनजागृती करण्याची गरज संस्थेने व्यक्त केली आहे. तसेच युवा व ज्येष्ठ या दोन्ही पिढ्यांमध्ये सामंजस्य घडवून आणण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
त्यासाठी ज्येष्ठांना डिजिटल साक्षर करायला हवे. जेणेकरून त्यांना व्यक्त होता येईल आणि त्यांच्यातील व तरुणांमधील दरी दूर करता येईल.
सर्वेक्षणात काय समोर आले?
56% ज्येष्ठांना घरात आदर दिला जात नाही.
49% ज्येष्ठांसोबत घरातील व्यक्ती बोलताना अश्लील भाषा वापरतात.
33% ज्येष्ठांना घरातील लोक दुर्लक्ष करून छळ करत असल्याचे वाटते.
18% ज्येष्ठ नागरिकांनी छळाविरोधात तक्रार करण्याचे धैर्य दाखवले आहे.