राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेचं इंजिन विधानसभेत धडकणार, ज्योतिषांचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:22 PM2019-05-20T14:22:13+5:302019-05-20T14:23:11+5:30
राज यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लढाईला बळ मिळाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादीसोबत युती करेल अशी चर्चा आहे.
नाशिक - लोकसभा निवडणुकीचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले असताना एक्झिट पोलच्या माध्यमातून अनेक अंदाज वर्तविण्यात येत आहेत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचा प्रभाव कितपत पडेल याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन आकडी संख्याबळ गाठेल असं भाकीत नाशिकमध्ये होत असलेल्या ज्योतिष परिषदेत वर्तविण्यात आलं आहे.
2014 ते 2019 हा काळात मनसे अथवा राज ठाकरेंना विशेष यश मिळालं नाही. मागील दोन महिन्यातील राज ठाकरेंच्या प्रचाराचा झंझावत बघता त्यांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल. राष्ट्रवादीसारख्या पक्षाशी हातमिळवणी करुन विधानसभेत मनसेची कामगिरी वाढेल. राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेची स्वत:ची एकगठ्ठा मते मिळून विधानसभेत त्यांचे आमदार निवडून जातील असं महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मराटकर यांनी सांगितले आहे. तसेच पक्षाच्या नवीन उभारणीसह मनसेचे दोन आकडी आमदार पुढील विधानसभेत दिसतील. 2019 ची विधानसभा निवडणूक मनसेसाठी फायदेशीर ठरणार असल्याचं भाकीत वर्तविण्यात ज्योतिष परिषदेत वर्तविण्यात आलं आहे.
दरम्यान केंद्रात मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील मात्र त्यांना बहुमत मिळणार नाही असं भाकीतही ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मराटकर यांनी व्यक्त केलं आहे. रविवारपासून नाशिकमध्ये ज्योतिष परिषद सुरु आहे त्यात विविध भाकीत व्यक्त केली जात आहेत. नाशिकात सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात भाकीत वर्तविण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा मनसेची झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरुवातीला राज्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक अटीतटीची करत राज्यातील निवडणुकीला रंग भरले. राज ठाकरे यांच्या लाव रे व्हिडीओमुळे भाजपाच्या विकासाच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले. राज यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपाविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लढाईला बळ मिळाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादीसोबत युती करेल अशी चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाची कामगिरी विधानसभेत किती यशस्वी ठरणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.