तरुणांकडून लग्नात मदत
By Admin | Published: May 16, 2016 01:40 AM2016-05-16T01:40:49+5:302016-05-16T01:40:49+5:30
तरुणांनी दैनंदिन खर्च कमी करून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील मुलीच्या लग्नास एक लाख रुपयांचे साहित्य देऊन मुलीचे लग्न लावले
शिरगाव : येथील तरुणांनी दैनंदिन खर्च कमी करून दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातील मुलीच्या लग्नास एक लाख रुपयांचे साहित्य देऊन मुलीचे लग्न लावले.
आई-वडील दुर्धर आजाराने त्रस्त, त्यातच भर म्हणून सलग तीन वर्षांपासून संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट. त्याच्या झळा या कुटुंबालाही लागलेल्या. अशात मुलगी लग्नाला आलेली. तिचे लग्न कसे करावे हा मोठा प्रश्न कुटुंबाला पडलेला. जमीन आई-वडिलांच्या आजारासाठी पूर्वीच विकलेली. अशा अडचणीत सापडलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथील जगन्नाथ उढाण व आशा उढाण यांची व्यथा नंदकुमार जाधव यांना समजली.
त्यांनी तत्काळ शिरगाव येथील श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टमधील त्यांच्या मित्र परिवाराला याबाबत सांगितले. त्या सर्वांनी मिळून या दाम्पत्याच्या सोनाली नावाच्या मुलीच्या लग्नासाठी दोन दिवसांत एक लाख रुपये जमा करून मुलीच्या लग्नासाठी व संसारासाठी लागणारे साहित्य खरेदी करून पाठवून दिले व मुलीचे लग्न लावले. जाधव, मनोज पंडित, नामदेव घाडगे, श्रीकांत घाडगे,अनिल शिंदे, विश्वनाथ यमुल, दिलीप शेजवळ, समाधान हजारे, प्रकाश चिकाने, बद्रिनारायण
पाटील यांनी लग्नासाठी पैशाची जमवाजमव केली. त्यातून भांडी, कपडे, कॉट, गादी, पलंग व काही अन्नदानाचे साहित्य अशी खरेदी केली.
माझ्या सर्व मित्रांची परिस्थिती अगदी बेताची असताना देखील समाजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेने त्यांनी मदत
केली.
सर्वांनी ही भावना मनात
ठेवून काम करावयाचे ठरवल्यास कोणीही अडचणीत सापडणार
नाही असे जाधव यांनी सांगितले. आपल्या लग्नासाठी आपल्या वडिलांना मदत केल्याबद्दल या अनोळखी व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सोनालीचे अश्रू अनावर झाले. (वार्ताहर)