अमोल यादवच्या कंपनीला मदत
By admin | Published: April 1, 2017 03:47 AM2017-04-01T03:47:24+5:302017-04-01T03:47:24+5:30
आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत
मुंबई : आपल्या घराच्या गच्चीवर विमान तयार करणाऱ्या अमोल यादव या तरुणाला सरकारी मदतीचे पंख मिळाले आहेत. यादव यांना राज्य सरकारकडून पालघरमध्ये १५७ एकरचा भुखंड मिळणार असून, तेथे सहा आसनी आणि वीस आसनी विमान बनविण्याचा कारखाना तो उभा करणार आहे.
जेट एअरवेजमध्ये डेप्युटी चिफ पायलट असलेल्या अमोलने कांदिवलीतील चारकोप येथील घराच्या गच्चीवर सहा आसनी विमान बनविले होते. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहात हे विमान ठेवण्यात आले होते. यादव यांची कल्पकता पाहून प्रभावित झालेल्या राज्य सरकारने आता त्यांना १५७ एकर जमीन पालघरमध्ये देऊ केली आहे. तेथे ते आपल्या थ्रस्ट इंडिया कंपनीमार्फत सहा आसनी आणि वीस आसनी विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांना सरकार मदत करीत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, यादव यांच्यासोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनाही बोलावण्यात आले आहे. डीजीसीएच्या विमान सुरक्षा अधिकाऱ्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
यादव यांनी सांगितले की, माझे स्वप्न सत्यात उतरताना दिसत आहे. १९९५मध्ये मी अमेरिकेत प्रशिक्षणासाठी गेलो होतो. जुन्या विमानांचे सुटे भाग वापरून स्वत:चे विमान तयार करणारे असंख्य लोक मला तिथे भेटले. त्यात अनेक जण मध्यमवर्गीय होते. तेथून मला प्रेरणा मिळाली. आपण आपली विमाने स्वत: बनवायला लागलो, तर भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात क्रांती येईल.
यादव म्हणाले की, माझ्यासमोरील या पुढचा मोठा प्रश्न भांडवलाचा राहणार आहे. मी एकच सहा आसनी विमान बनविले. त्यावर काही कोटी रुपये खर्च झाले. यावरून खर्चाची कल्पना यावी. सरकारकडून बीज भांडवल मिळाल्यास मला मदत होईल.
असे आहे विमान
हे विमान १,५00 फूट प्रति मिनीट या वेगाने १३ हजार फूट उंच झेप घेऊ शकते. ते एका वेळी २ हजार किमी उड्डाण करू शकते. त्याची गती प्रतितास १८५ हवाई मैल आहे. ते सध्या धुळ््याच्या विमानतळावर ठेवले आहे.