वाढदिवशी दिला वंचितांना मदतीचा हात
By admin | Published: July 23, 2016 04:25 AM2016-07-23T04:25:34+5:302016-07-23T04:25:34+5:30
कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
मुंबई : राज्यातील विविध तीस जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले तसेच मुंबईतील कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस साजरा केला. कॅन्सरग्रस्त मुलांनी मुख्यमंत्र्यांसाठी खास तयार केलेली भेटकार्डे देऊन व केक कापून शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत करण्यात आली.
कॅन्सर पेशंट एड असोसिएशनने या पंधरा मुलांची वर्षा या निवासस्थानी फडणवीस यांची वाढिदवसानिमित्त भेट घालून दिली. यावेळी दोघा मुलींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले तर लहान मुलांनी केक कापून व स्वत: बनविलेली भेट कार्डे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, असोसिएशनच्या कार्यकारी संचालक अनिता पीटर आदी उपस्थित होते.
दुपारी विधिमंडळात त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमातील विद्यार्थिनिंनी मुख्यमंत्र्यांना ओवाळून वाढदिवस साजरा केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ही मुले असून सध्या या आश्रमात शिक्षण घेत आहेत.
मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे राज्यातील १७ जणांना वैद्यकीय साहाय्यतेच्या धनादेशाचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळातील
एका छोटेखानी समारंभात झाले. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या कुटुंबियांनी शीतल सुखदेव गव्हाणे या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. या खर्चाचा एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आदी उपस्थित होते.
>हॅपी बर्थडे!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. त्यावेळी फडणवीस यांना केक भरविताना एक मुलगा. सोबत अभिनेता विवेक ओबेरॉय.