परीक्षेचे दडपण दूर करण्यासाठी हेल्पलाइन
By admin | Published: February 27, 2017 05:18 AM2017-02-27T05:18:46+5:302017-02-27T05:18:46+5:30
महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली
प्राची सोनवणे,
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांच्या मदतीला यंदाही बोर्डाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनचा वापर करून परीक्षेच्या सेंटरची खात्री, मनातील परीक्षेविषयीची भीती, तणाव, वेळापत्रक यावर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही मार्गदर्शन केले जाणार आहे. ही हेल्पलाइन २७ फेब्रुवारीपासून ते १ मार्च या कालावधीत सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार असून, एक दिवसावर येऊन ठेपलेल्या या परीक्षेच्या वेळी निराशा, तसेच अभ्यासाबाबत तक्रारींविषयीच्या समस्या विद्यार्थ्यांनी या हेल्पलाइनवर मांडता येणार आहेत. गेल्यावर्षी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास लक्षात राहत नाही, घाबरगुंडी उडाली आहे, पोटात गोळा आला, परीक्षेत कमी गुण मिळाले तर, अशा चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नांनी समुपदेशकही हैराण झाले होते. विद्यार्थ्यांबरोबरच पालकही तितकेच त्रस्त आहेत, असे असून पाल्याच्या अभ्यासाविषयी तक्रारी, परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी खात्री करण्यासाठी पालकांनीही या हेल्पलाइनचा आधार घेतला आणि घेत असल्याची माहितीही शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. मुंबई विभागातील समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी परीक्षेला जाण्याअगोदर परीक्षार्थी या हेल्पलाइनचा आधार घेत परीक्षा केंद्राची खात्री करून घेतात. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे समाधान व्हावे, यासाठी समुपदेशकांकडून पुरेपूर खात्री करून घेतली जाते, असेही शिनगारे यांनी स्पष्ट केले.
>१२ समुपदेशकांची नियुक्ती
मुंबई विभागातून १२ समुपदेशकांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. शनिवारपासूनच समुपदेशकांचा फोन खणाणू लागला असून, दोन दिवसांत ५० विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्याची माहिती समुपदेशक श्रीकांत शिनगारे यांनी दिली.
बोर्डाची हेल्पलाइन सोमवारी २७ फेब्रुवारीपासून सुरू होत असून आसन व्यवस्था, परीक्षा केंद्र आदींची माहिती या हेल्पलाइनवर मिळेल.
मात्र, बैठक व्यवस्था, हॉल तिकीट, केंद्राविषयीची माहिती समुपदेशकांना विचारू नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची निवड केल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली.
>मुंबई विभागीय मंडळाचा हेल्पलाइन क्रमांक : २७८९३७५६/
२७८८१०७५
>समुपदेशनाकरिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा
श्रीकांत शिनगारे - ९८६९६३४७६५
अशोक सरोदे - ८८८८८३०१३९
चंद्रकांत मुंढे - ९८६९३०७६५७
अनिलकुमार गाढे - ९९६९०३८०२०
स्मिता शिपुरकर - ९८१९०१६२७०