महिलांसाठीची ‘हेल्पलाइन’च मुकी!
By Admin | Published: November 25, 2015 03:42 AM2015-11-25T03:42:15+5:302015-11-25T03:42:15+5:30
संकटात सापडलेल्या महिलांना त्वरित पोलीस साहाय्य मिळावे या हेतूने मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली पोलीस हेल्पलाइन अनेक ठिकाणी मुकीच असल्याने असाहाय्य महिलांच्या हाकेला आता कोण धावून जाणार
मुंबई : संकटात सापडलेल्या महिलांना त्वरित पोलीस साहाय्य मिळावे या हेतूने मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेली पोलीस हेल्पलाइन अनेक ठिकाणी मुकीच असल्याने असाहाय्य महिलांच्या हाकेला आता कोण धावून जाणार, असा प्रश्न पडला आहे. ‘लोकमत’ने राज्यभर केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून हे सत्य उघडकीस आले आहे.
२५ नोव्हेंबर या जागतिक महिला अत्याचारविरोधी दिनानिमित्त महिला सुरक्षेसाठी शासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा ‘लोकमत’ने घेतला. त्या वेळी संकटात सापडलेल्या महिलांना शासकीय यंत्रणांकडून मदत मिळण्यातील अनेक त्रुटी समोर आल्या. मात्र त्याच वेळी काही जिल्ह्यांत यंत्रणा अतिशय दक्ष असल्याचेही दिसून आले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागासाठी राज्य शासनाने २८ फेब्रुवारी २००८ रोजी १०३ ही महिला सुरक्षा हेल्पलाइन सुरू केली; तसेच उर्वरित महाराष्ट्रभरात १०९१ हा क्रमांक सुरू करण्यात आला. जिल्ह्याच्या पोलीस नियंत्रण कक्षातून त्यावर येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या क्रमांकाचा वापर महिलांनी मोठ्या प्रमाणात केला. परंतु, ग्रामीण भागांत याला तितकाचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसले. मुंबईमध्ये महिन्याकाठी तब्बल १५ ते १६ हजार कॉल या हेल्पलाइनवर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यापैकी केवळ २५ टक्के कॉल गंभीर असल्याचेही निष्पन्न झाले आहे. पुण्यामध्ये गेल्या ११ महिन्यांनी ४३८ महिलांनी या क्रमांकाचा वापर केला.
स्टिंग आॅपरेशनमधून पुढे आलेले काही मुद्दे
मुंबईमध्ये प्रतिनिधीने 103 क्रमांकावर संपर्क केला असता, समोरच्या व्यक्तीने ठाणे नियंत्रण कक्षाला फोन लागल्याचे सांगून मदत करण्यास असमर्थता दर्शविली.
लातूरमध्ये तर फोन उचललाच गेला नाही.
वर्धा आणि सोलापूरमध्ये मात्र पोलीस १५-२० मिनिटांत सांगितलेल्या ठिकाणी दाखल झाले.भंडारा आणि धुळे पोलिसांनीही तातडीने प्रतिसाद देत, घटनेची माहिती वायरलेस पथकाला दिली किंवा कार्यवाहीला सुरुवात केली.
1091स्थळ : वर्धाएका बनावट तक्रारकर्त्यामार्फत संपर्क साधला असता केवळ १४ मिनिटांत पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली.
नागपुरात महिन्याकाठी या क्रमांकावर कॉल करणाऱ्यांची संख्या १०० ते १२५ आहे. याउलट उस्मानाबाद जिल्ह्यात ८ महिन्यांत या क्रमांकावर केवळ ११ तक्रारी, जालन्यात गेल्या वर्षभरात केवळ ८ तक्रारी, नांदेडमध्ये दरमहा १० ते १२ तक्रारी, सोलापूरमध्ये ११ महिन्यांत ७४ तक्रारी, तर वर्ध्यात वर्षभरात केवळ ८ तक्रारी या क्रमांकावर दाखल करण्यात आल्या आहेत.
1091स्थळ : धुळे
वेळ : दुपारी २.१५
पोलीस : तुमची तक्रार सांगा...
प्रतिनिधी : शहरातील एका महाविद्यालयात काही टवाळखोर मुलींची छेड काढत आहेत.
पोलीस : तुम्ही घटनास्थळाजवळच थांबा, मी लगेच देवपूर पोलिसांना फोन करतो, ते ५ मिनिटांतच तेथे पोहोचतील.
0217-2744600 सोलापूर : वेळ : ५ वाजून ५७ मिनिटे
प्रतिनिधी : हॅलो, एका महिलेची छेडछाड होत आहे.
पोलीस : बरं. तातडीने पोलिसांना पाठवितो.
१९ मिनिटांनंतर राजेंद्र बाबर आणि योगेश ननवरे हे दोन पोलीस मोटारसायकलवरून घटनास्थळी पोहोचले.
1091 स्थळ : भंडारा
प्रतिनिधी : भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात एका महिलेला मारहाण होत आहे.
पोलीस : मी लगेच याची माहिती महिला अत्याचारविरोधी पथकाला देतो.
फोन सुरू असतानाच इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीच्या माध्यमातून वायरलेसवर सूचना देण्याचा प्रयत्न करीत असतानाच हे स्टिंग आॅपरेशन असल्याचे सांगण्यात आले.
103स्थळ : मुंबई
प्रतिनिधी : हॅलो.. मला मदत हवी आहे.. मी मुलुंड चेकनाक्यावरून मुलुंड स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. परंतु रिक्षाचालकाने मला स्थानकात न उतरविता एलबीएस रोडवरील एका निर्जन स्थळी उतरविले. मला मुलुंडबाबत जास्त माहिती नसल्याने मी स्टेशनपर्यंत कशी जाऊ ? याबाबत आपल्याकडून काही मदत मिळू शकते का?
पोलीस : सॉरी मॅडम... आपला कॉल ठाणे हेल्पलाइनच्या नियंत्रण कक्षात लागला आहे. त्यामुळे आमच्याकडे मुंबईचा डाटा उपलब्ध नसल्याने आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही.
प्रतिनिधी : का? मला किमान
स्थानिक पोलीस ठाण्याचा क्रमांक मिळू शकतो का?
पोलीस : नाही.. हा प्रॉब्लेम नेहमीचा आहे. काही विशिष्ट सिमकार्डमुळे मुंबईचे कॉल ठाण्यात तर ठाण्याचे कॉल मुंबईत येत आहेत. त्यात मुंबईचा डाटा आमच्याकडे नसतो. तुम्ही १०० क्रमांकावर कॉल करा.
असे बोलून संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने कॉल कट केला...
1091स्थळ : जालनासोमवारी सकाळी ११ वाजता या क्रमांकावर संपर्क साधला असता फोन तत्काळ उचलण्यात आला. तक्रारीबाबत विचारपूसही करण्यात आली.
1091स्थळ : सातारा
प्रतिनिधी : हॅलो, खटावच्या नातेवाईक महिलेवरील अत्याचाराची तक्रार द्यायची आहे. जाचामुळे तिला घराबाहेर पडणे शक्य नसल्याने आम्ही संपर्क साधला आहे. पोलीस : इथे तक्रार नोंदवता येणार नाही. तुम्ही ‘एलसीबी’शी संपर्क साधून तक्रार नोंदवा. ‘एलसीबी’मध्ये माहिती विचारली असता ‘पथकाची नियुक्ती कंट्रोल रूममध्ये असल्याने माहिती तिथेच मिळेल,’ असे सांगण्यात आले.1091स्थळ : लातूर२० नोव्हेंबर रोजी हा क्रमांक अनेक वेळा डायल केला. परंतु, फोन उचलण्यात आला नाही.
1091स्थळ : कोल्हापूरप्रतिनिधीचा फोन एका पोलिसाने उचलला; पण त्यांना महिला अत्याचाराबाबत सांगितले असता, त्याने थेट साहेबांनाच विचारा, असे उत्तर देऊन साहेबांच्याकडे फोन ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला; पण साहेब जेवायला गेल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गावित यांनी माहिती घेतली.
100स्थळ : मुंबईप्रतिनिधी : हॅलो.. सर मला मुलुंड रेल्वे स्थानकाकडे जायचे होते. मात्र रिक्षाचालकाने मला एका निर्जन स्थळी सोडले आहे. मला मदत मिळू शकते का? मी आपल्या १०३ क्रमांकावर कॉल केला; तो ठाणे नियंत्रण कक्षात लागल्यामुळे त्यांनी तुम्हाला कॉल करायला सांगितले आहे.
हेल्पलाइन : नमस्कार मॅडम.. ठाणे कंट्रोल रूम.. तुमचा कॉल ठाणे कंट्रोल रूमला लागला असल्याने तुम्हाला इथून मदत मिळणे शक्य नाही.
प्रतिनिधी : असे का? १०३वरही कॉल केला होता. त्यांनीही हेच उत्तर दिले. प्रॉब्लेम काय आहे?
हेल्पलाइन : फक्त काही सिमकार्ड प्रॉब्लेममुळे १०० आणि १०३ नियंत्रण कक्षावर असे बरेच कॉल येत आहेत.
प्रतिनिधी : मी दूरध्वनीवरून कॉल करू का? प्लीज मला मुलुंडबाबत काहीच माहिती नाही. किमान पोलीस ठाण्याचा क्रमांक मिळेल का?
हेल्पलाइन : सॉरी मॅडम.. एक मिनिट थांबा हं.. (त्यानंतर कॉल होल्डवर टाकून त्यांनी क्रमांक शोधण्यास सुरुवात केली.) हां.. मॅडम.. हा मुलुंड पोलीस ठाण्याचा क्रमांक लिहून घ्या..
प्रतिनिधी : धन्यवाद सर...
(आपले नाव काय? हे विचारताच समोरच्या व्यक्तीने कॉल कट केला.)