केईएम रुग्णालयात होणार हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By admin | Published: May 17, 2016 03:38 AM2016-05-17T03:38:41+5:302016-05-17T03:38:41+5:30
केईएम रुग्णालयामध्ये आता हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे
मुंबई : केईएम रुग्णालयामध्ये आता हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी मिळालेले केईएम हे राज्यातील पहिले रुग्णालय आहे. या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी आरोग्यसेवा संचालनालयाने केईएमची पाहणी केली आहे. या पाहणीनंतर हात प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाला परवानगी दिल्याची माहिती मुंबईत विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे.
केईएम रुग्णालयात हात प्रत्यारोपणासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी पूर्ण होत आली आहे. गेल्या वर्षी कोचीमध्ये अमृता इन्स्टिट्युट आॅफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरमध्ये प्रथमच एका व्यक्तीवर यशस्वी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर, राज्यात प्रथमच मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत दोन्ही हात नसलेल्या व्यक्तींची नावनोंदणी करून प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. दोन्ही हात नसलेल्या व्यक्तींचाच या यादीत समावेश करण्यात येणार आहे.
अनेकदा अपघातग्रस्त व्यक्ती गोल्डन अवरमध्ये रुग्णालयात पोहोचू शकत नाही. त्यामुळे या व्यक्तींना हात गमवावे लागतात. आता मात्र केईएममध्ये प्रत्यारोपण करता येणार आहे. कोपराखाली हात तुटला असेल, तर त् प्रत्यारोपण करणे सोपे जाते. तथापि, जन्मत: आजार असलेल्या व्यक्तींच्या हातात दोष असल्यास त्या व्यक्तींवर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य नाही. कारण प्रत्यारोपणासाठी हाताच्या नसा कार्यरत असणे आवश्यक असल्याचे, केईएम रुग्णालयाच्या प्लॅस्टिक आणि रिकंस्ट्रक्टिव्ह विभाग प्रमुख डॉ. विनीता पुरी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अपघातात हात गमावलेल्या व्यक्तींना कृत्रिम हात बसविण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. पण त्या हातांची हालचाल होत नाही. त्यामुळे अनेकदा कृत्रिम हात बसवणे टाळले जाते. पण प्रत्यारोपणानंतर हालचाल शक्य आहे.