हेमा-चिंतनच्या नात्यामध्ये आला ‘अभिमान’
By admin | Published: December 18, 2015 01:24 AM2015-12-18T01:24:51+5:302015-12-18T01:24:51+5:30
सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी हेमाच्या कुटुंबीयांनी मौन तोडले. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी
मुंबई : सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी हेमाच्या कुटुंबीयांनी मौन तोडले. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची मुख्य भूमिका असलेला हिंदी चित्रपट ‘अभिमान’सारखेच हेमा आणि चिंतनचे आयुष्य होते. हेमाची वाढती प्रसिद्धी चिंतनला बघवत नसल्याने, तिला तो दु:ख द्यायचा. त्यामुळेच लग्नाच्या वाढदिवशी फार आनंदात असताना, त्याने हेमाला घटस्फोटाची नोटीस दिली होती, असा आरोप हेमाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेमा आणि चिंतनच्या लग्नाचा वाढदिवस ३१ आॅक्टोबरला होता. २००९ या वर्षी खूप आनंदात असताना चिंतनने तिला लग्नाची भेट म्हणून घटस्फोटाची नोटीस पाठवली होती, असे हेमाचे चुलत भाऊ दीपक प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रसाद हे मूळचे चेंबूर येथील राहणारे असून, सध्या कामाच्या निमित्ताने ते आणि त्यांचे कुटुंबीय बँकॉकमध्ये वास्तव्यास आहेत. गुरुवारी त्यांनी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याच्यावरच हेमाच्या हत्येचा आरोप लावत, या दोघांच्या कौटुंबिक संबंधांतील माहिती उघड केली. हेमा आणि चिंतन मुंबईला आले, तेव्हा सुरुवातीला संघर्षमय आयुष्य असताना ते दहिसरला राहत होते. त्यानंतर थोडासा जम बसल्यानंतर बोरीवलीमध्ये त्यांनी भाडेतत्त्वावर एक घर घेतले.
या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू झाला. त्यामुळे २००५ साली त्यांनी जुहूमध्ये स्वत:चे एक घर घेतले. या ठिकाणी त्यांचा स्टुडिओदेखील होता. मात्र, २००६ मध्ये या दोघांमध्ये लहान-मोठ्या कारणावरून खटके उडू लागले. २००८ मध्ये चिंतनची आई त्यांच्या घरी राहायला आली. तेव्हा हेमा घर सोडून निघून गेली आणि जवळपास सात महिने ती चिंतनपासून वेगळी बोरीवलीमध्ये पुन्हा त्याच भाड्याच्या घरात राहू लागली. हेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी होऊ लागली. मात्र, चिंतनचा व्यवसायात जम बसत नव्हता. त्यामुळे त्याने तिला परदेशातील ग्राहकांशी ओळख करून देण्यास सांगितले, ज्याचा तिने विरोध केला. चिंतन हा हेमाची त्याच्या मित्रांसमोर खिल्ली उडवायचा, तसेच तिला अपमानीतही करायचा. त्यामुळे त्याचे मित्रदेखील तिची थट्टामस्करी करायचे.
एकदा वडाळ्यात एका कार्यक्रमाला जाताना या दोघांचे किरकोळ कारणावरून आपापसात भांडण झाले. तेव्हा चिंतनने तिला गाडीतून जबरदस्ती उतरविले आणि तो निघून गेला. घरी पोहोचल्यावर हेमा बेडवर जेवत असताना त्याने तिला लाथेने उडविले. अशा प्रकारे तो तिला अन्यायकारक वागणूक देत असल्याचे सांगताना प्रसादचे डोळे भरून आले.
चिंतन विरोधात
पुरावे देणार होता गोटू
चिंतनशी संबंधित आलेले सर्व संपर्क तोडून टाकण्याचा सल्ला प्रसादनी हेमाला दिला होता. गोटूसोबतही ती गेल्या दीड वर्षांपासून काम करत नव्हती. तिने गोटूला दोन वर्षांपूर्वी दोन लाख रुपये मदत म्हणून दिले होते. हत्येच्या २० दिवस आधी गोटू तिच्या अंधेरीतील लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये असलेल्या स्टुडिओत आला, तेव्हा त्याने कर्मचाऱ्यांकडून हेमाचा मोबाइल क्रमांक मागितला. मात्र, तेव्हाच हेमा तिथे आली. त्यावेळी तिने दिलेल्या कर्जापैकी दहा हजार रुपये परत करण्यासाठी आपण आल्याचे गोटूने सांगितले. त्यावेळी ‘मी पैसे मागितले नसून तू इथून निघून जा,’ असे हेमाने सांगितले. या माणसाला पुन्हा इथे प्रवेश देऊ नका, असे स्टाफला बजावले. मात्र, चिंतन विरोधात त्याच्याकडे काही पुरावे असल्याचे तिला कळाले. तेव्हा विद्याधर राजभर उर्फ गोटूकडे ती भंबानी यांना घेऊन गेली. चिंतनविरुद्ध न्यायालयात वापरता येतील, असे काही पुरावे तो तिला देईल, अशी तिला आशा होती, पण त्यासाठी त्याला आर्थिक मोबदला हवा होता. कांदिवलीला हेमाला बोलावून त्याने तिचा विश्वासघात केल्याचेही प्रसाद यांचे म्हणणे आहे.
हेमा १५ लाखांची अंगठी घालायची. त्यामुळे तिने गोटूचे पाच लाख रखडवल्याची बाब खोटी आहे. तिने नोकरांसाठीदेखील दोन दोन लाख रुपये ठेवले होते. तिचे काही बरेवाईट झाल्यास ते नोकरांना द्यावे, असे तिने आईला सांगून ठेवल्याचेही प्रसाद यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
सीबीआय चौकशीची मागणी
हेमाच्या घरच्यांना एफआयआरची प्रत अजून मिळालेली नाही, तसेच त्यात संबंधित कलमेदेखील लावण्यात आलेली नाहीत. त्याचप्रमाणे, त्यात चिंतनच्या नावाचा देखील उल्लेख करणे गरजेचे आहे, असे प्रसाद यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घटस्फोटासाठी चिंतन वेगळा : चिंतनने हेमाकडून घटस्फोट मागितला. मात्र, जर ते एकत्र राहिले असते, तर त्यांना घटस्फोट मिळाला नसता. त्यामुळेच तो दिल्लीला जाऊन राहू लागल्याचे प्रसाद यांचे म्हणणे आहे. हेमामध्ये दोष असल्याने तिला मूल होणे शक्य नसल्याचे डॉक्टरांचे मत होते. त्यामुळे तिने चिंतनलादेखील त्याची तपासणी करून घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याचा ‘इगो’ दुखावला होता.