विठ्ठल मंदिराला हेमाडपंती रूप
By Admin | Published: April 12, 2016 02:57 AM2016-04-12T02:57:38+5:302016-04-12T02:57:38+5:30
शेकडो वर्षांपासून साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिर कात टाकणार असून, पुन्हा एकदा मंदिराला त्याच्या स्थापनेच्या वेळचे मूळ हेमाडपंती रुप येणार आहे.
- दीपक होमकर, पंढरपूर
शेकडो वर्षांपासून साऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे विठ्ठल मंदिर कात टाकणार असून, पुन्हा एकदा मंदिराला त्याच्या स्थापनेच्या वेळचे मूळ हेमाडपंती रुप येणार आहे. भारतीय पुरातत्व खात्यानेच ही जबाबदारी स्वीकारली असून, चैत्र वारी होताच या कामाला सुरुवात होणार आहे.
विठ्ठल मंदिराची निर्मिती कधी झाली याबाबत नेमके दाखले नसले तरी मंदिराची मूळ रचना ही हेमाडपंथी आहे. शिवाय बाराव्या शतकात ज्ञानदेवांचे वडीलही पंढरीच्या वारीला यायचे, असा उल्लेख असल्याने हे मंदिर बाराव्या शतकाच्याही आधीचे असावे असा उल्लेख सापडतो. इतिहास अभ्यासकांच्या मते मुस्लीम राजवटीत हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झाले होते. मात्र मराठ्यांच्या साम्राज्यात साधारण सतरा व अठराव्या शतकात मंदिराचा पुन्हा जीर्णाेध्दार झाला आणि गाभाऱ्यापासून ते मंदिराच्या तटबंदीपर्यंतचा सर्व भाग टप्प्याटप्प्याने बांधण्यात आला. अगदी १९व्या शतकाच्या उत्तरार्धात बडवे आणि उत्पात यांच्या अधिपत्याखालीही मंदिराचे लाकडी सभामंडप, काँक्रीटचा स्लॅब अशा सुधारणा करण्यात आल्या.
साधारण १९व्या शतकामध्येच मंदिराच्या भिंती, कळसांना रंगरंगोटी करण्यात आली. शिवाय विठ्ठल मंदिर , महालक्ष्मी मंदिर व तटबंदी यांना जोडणारा स्लॅबही बांधण्यात आला होता. मात्र या स्लॅबच्या वजनाने मंदिराच्या भिंतींना धोका असल्याचा अहवाल पुरातत्व खात्याने दिल्याने मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी हा स्लॅब पाडला व मंदिराला पुरातन काळातील मूळ रुप देण्यास सुरुवात केली.
मंदिराची रंगरंगोटी काढून पूर्वीच्या काळातील मूळ गुळगुळीत स्वरूपाच्या काळाकुट्ट दगडी रुपातील मंदिराचा लूक मंदिराला पुन्हा यावा यासाठी सभापती मुंढे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला प्रस्ताव पाठविला होता़ त्याचा पाठपुरावा करुन तो प्रस्ताव मंजूरही करून घेतला असून, चैत्री वारी होताच या कामाला सुरुवात होणार आहे.
६८ लाखांचा प्रस्ताव
मूळ रूपात मंदिर पुन्हा साकारण्यासाठी समितीसमोर खासगी कंत्राटदार आणि शासनाचे पुरातत्व विभाग असे दोन पर्याय होते़ समितीने पुरातत्व विभागाला प्राधान्य देऊन याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता. पुरातत्व खात्याकडून मंदिराच्या वास्तूची पाहणी केल्यानंतर याबाबत ६८ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव दिली होता. तो मंदिर समितीने मान्य करून पुरातन विभागाला काम करण्यास सांगितले आहे. चैत्री वारी संपताच या कामाला सुरुवात होणार असून, आषाढीपूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वारीत येणाऱ्या भाविकांना मंदिराचे मूळ पौराणिक रुप पाहायला मिळेल.
-शिवाजी कादबाने, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर