लातूरचे हेमंत कोटलवार युरोपात राजदूत; मराठवाड्याला बहुमान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 03:10 AM2020-07-16T03:10:11+5:302020-07-16T06:15:38+5:30
कोटलवार यांच्या नियुक्तीमुळे राजदूत म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळाला आहे.
लातूर : लातूरचे हेमंत हरिश्चंद्र कोटलवार यांची युरोपमधील चेक रिपब्लिक येथे भारताचे राजदूत म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नुकतीच नियुक्ती केली. कोटलवार हे १९९६ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असून, त्यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून विविध देशांमध्ये सक्षमपणे भूमिका बजावली आहे.
कोटलवार यांच्या नियुक्तीमुळे राजदूत म्हणून नियुक्त होण्याचा बहुमान मराठवाड्याला पहिल्यांदाच मिळाला आहे. सौदी अरेबिया आणि येमेनच्या युद्धात अडकून पडलेल्या हजारो भारतीय नागरिकांच्या यशस्वी सुटकेसाठी केलेली मध्यस्थी, लडाख प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहसचिव म्हणून केलेले काम उल्लेखनीय आहे.
भारतात पारपत्र वितरणाची आॅनलाईन प्रणाली विकसीत करून भ्रष्टाचारमुक्त यंत्रणा उभारण्याचे काम त्यांच्याच कार्यकाळात सुरू झाले. आजवरच्या यशाचे श्रेय त्यांनी आई रजनी व वडील प्राचार्य हरिश्चंद्र कोटलवार यांना दिले आहे.