हेमाचा पती चिंतन उपाध्यायला अखेर अटक
By admin | Published: December 23, 2015 02:36 AM2015-12-23T02:36:42+5:302015-12-23T02:36:42+5:30
सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बुधवारी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याला मुख्य संशयित म्हणून अटक केली
मुंबई : सुप्रसिद्ध शिल्पकार हेमा उपाध्याय (४२) आणि त्यांचे वकील हरिश भंबानी (६५) यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बुधवारी हेमाचा पती चिंतन उपाध्याय याला मुख्य संशयित म्हणून अटक केली. चिंतननेच हेमा यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांना संशय आहे.
या हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच चिंतन संशयाच्या भोवऱ्यात होता. अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत हत्येमागे चिंतनचाच हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्याला अटक करून बोरीवली न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील अन्य आरोपींना २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
> ‘क्लोरोफॉर्म’
हेच हत्यार
चिंतनने हेमाच्या हत्येसाठी गोटू आणि अन्य मारेकऱ्याना फक्त ‘क्लोरोफॉर्म’चा वापर करण्याचे आदेश दिले होते. कोणत्याही प्रकारचे हत्यार पोलिसांना सापडू नये, असा त्यामागील उद्देश असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
> चिंतन हा हेमासोबत सुरू असलेल्या घटस्फोटाच्या मुद्द्यावरून वैतागला होता. त्याने तिला संपवण्याचे ठरविले होते. गेले तीन महिने तो हत्येचा कट रचत होता.
हत्येआधी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चिंतनची टेम्पोचालक विजयकुमार राजभर आणि सध्या फरार असलेल्या विद्याधर राजभर उर्फ गोटूसोबत बैठक झाली होती. त्यातील एक बैठक मुंबईत झाली होती. या बैठकीत त्याने हेमाच्या हत्येसाठी एक ठरावीक रक्कम देण्याचे निश्चित केले होते. तसेच काही रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.