‘हिमोफिलिया’ रुग्णांना ‘फॅक्टर-९’ अभावी धोका; मोजक्याच ठिकाणी उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 04:17 AM2020-03-11T04:17:31+5:302020-03-11T06:38:00+5:30
मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. ‘हिमोफिलिया’ हा अनुवांशिक आजार प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो.
प्रवीण खेते
अकोला : रक्ताशी निगडित ‘हिमोफिलिया’ आजारावर राज्यात मोजक्याच शहरात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे; परंतु त्या ठिकाणीही रुग्णाला आवश्यक फॅक्टरचे इंजेक्शन मिळेलच, असे नाही. राज्यात सध्या ‘फॅक्टर-९’चा (रक्तातील एक घटक) तुटवडा भासत असून, इंजेक्शनसाठी रुग्ण राज्यभर फिरत आहेत.
‘हिमोफिलिया’ हा जन्मत:च होणारा रक्ताशी निगडित आजार आहे. रक्त गोठण्यासाठी आवश्यक १३ फॅक्टरपैकी एकाही फॅक्टरची कमतरता असल्यास किंवा तो फॅक्टरच रक्तामध्ये नसल्यास, हा आजार संभवतो. अशा रुग्णाला योग्यवेळी आवश्यक तो फॅक्टर न मिळाल्यास, रुग्णाला अंतर्गत रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो. त्यात रुग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. या आजाराच्या उपचारासाठी राज्यात विभाग स्तरावर ‘डे केअर युनिट’ सुरू करण्यात आले आहेत. मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, कसारा आणि अमरावती येथे डे-केअर युनिट सुरू आहे. ‘हिमोफिलिया’ हा अनुवांशिक आजार प्रामुख्याने मुलांमध्ये आढळतो. ‘फॅक्टर’चा तुटवडा असल्याचे अमरावतीच्या हिमोफिलिया डे-केअर युनिटचे विभाग प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.
तीन प्रकार
फॅक्टर आठ नसल्यास ‘हिमोफिलिया-अ’
फॅक्टर नऊ नसल्यास ‘हिमोफिलिया-ब’
फॅक्टर अकरा नसल्यास ‘हिमोफिलिया-क’
लक्षण
रक्त गोठणाऱ्या
घटकांची कमतरता
अंतर्गत व बाह्य रक्तस्त्राव
‘हिमोफिलिया’ बद्दल महत्त्वाचे
हा आजार मुख्यत्वे ‘एक्स प्रोमोझोन’वर असल्याने पुरुषांमध्येच उद््भवतो.
स्त्रियांमध्ये दोन ‘एक्स प्रोमोझोन’ असल्याने स्त्री या आजाराची वाहक असते.
‘फ्रेश प्रोझोन प्लाज्मा’ पासून फॅक्टर तयार केले जातात.
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अन् हैदराबाद येथील रुग्णांवरही राज्यात उपचार.