म्हणून प्रचाराला मिळतो कमी अवधी
By admin | Published: August 24, 2016 08:29 PM2016-08-24T20:29:54+5:302016-08-24T20:29:54+5:30
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़
ऑनलाइन लोकमत
मुंबई , दि. 24 - महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर होऊन प्रभागांच्या फेररचनेची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र आरक्षणाच्या कचाट्यातून आपला वॉर्ड सुटला तरी फेररचनेत काय होईल, या भीतीने नगरसेवक धास्तावले आहेत़ त्यातच प्रभागांची फेररचना नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट होणार आहे़ या बदलेल्या मतदारसंघात प्रचार करण्यासाठी केवळ दोन ते तीन महिन्यांचा वेळ मिळत असल्याने नगरसेवकांचे टेन्शन वाढले आहे़.
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार आहे़ यामुळे इच्छुक नगरसेवक व पक्षातील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे़ मात्र प्रचाराला सुरुवात करण्याआधी आरक्षणाची सोडत आणि त्यात आता प्रभागांची फेररचनेकडे नगरसेवक डोळे लावून बसले आहेत़ सोडतीमध्ये आपल्या वॉर्ड महिला अथवा मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित झाल्यास जवळच्या वॉर्डांमध्ये चाचपणी करण्यास नगरसेवकांनी यापूर्वीच सुरुवात केली आहे़ .
सणासुदीचा काळ हा मतदारसंघामध्ये प्रचारसाठी, घरोघरी पोहोचण्याकरिता बेस्ट असल्याने फेरचनेची प्रक्रिया त्यापूर्वी पूर्ण व्हावी, अशी नगरसेवकांना आशा होती़ मात्र प्रभाग फेररचनेचे निकाल नोव्हेंबरमध्ये जाहीर होत असल्याने नगरसेवकांची सर्व गणित बिघडली आहेत़ त्यातही आशावादी असलेल्या नगरसेवकांनी आपल्या व बाजूच्या वॉर्डात नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे़.