...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 05:24 AM2024-11-17T05:24:06+5:302024-11-17T05:25:42+5:30
'आता कोणताही फॅक्टर चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे', असेही गोयल जरांगे फॅक्टर बद्दल बोलताना म्हणाले.
मुंबई : धर्म, जात आणि भाषेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील जनतेत फूट घडवून आणत आहे. त्यांचा तो एकमेव कार्यक्रम असून, त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत. काँग्रेसच्या या नीतीला उत्तर देण्यासाठी आणि देश एकसंघ राखण्याच्या हेतूनेच आम्ही ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा देत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत केले. यावेळी त्यांनी बटेंगे तो कटेंगे, जरांगे फॅक्टर, मुस्लिम आरक्षण आदी मुद्द्यांवर सविस्तर विवेचन केले.
लोकसभेला काँग्रेसने ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता जनता सावध झाली आहे. मी गेले काही दिवस राज्याचा दौरा करीत असून, जनता महायुतीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट चित्र आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुंबईत आम्ही दणदणीत जागा जिंकणार आहोत. महाविनाश आघाडीचा पराभव अटळ आहे, असे ते म्हणाले.
उलेमांच्या शिष्टमंडळाला काँग्रेसने मुस्लिम आरक्षणाबाबत लेखी आश्वासन दिले आहे. दलित, ओबीसी यांचे आरक्षण कापून मुस्लिमांना १० टक्के आरक्षण देण्याचे काँग्रेसचे व्होट बँकेचे राजकारण सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का तसेच बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक करण्याचे धाडस राहुल गांधी दाखवणार का, असा सवाल त्यांनी केला.
काँग्रेस पक्ष तुटत चालला आहे. उद्धव ठाकरेंना लोक सोडून जात आहेत. या निवडणुकीनंतर त्यांच्या पक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतील. काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, अशी बाळासाहेबांची ठाम भूमिका होती. उद्धव यांना मात्र या भूमिकेचा विसर पडल्याची टीका गोयल यांनी यावेळी केली.
जरांगे फॅक्टरचा भाजप-महायुतीला फटका बसेल का?
जरांगे फॅक्टरचा भाजपला किंबहुना महायुतीला किती फटका बसेल, असे विचारले असता, आता कोणताही फॅक्टर चालणार नाही. महायुती सरकारने लोकांच्या हिताच्या अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती जनतेला भावली आहे. त्यामुळे महायुती आघाडीलाच लोक पुन्हा सत्तेवर बसवणार असून, महाराष्ट्र बरबाद करण्याचा उद्योग करणाऱ्या महाविनाश आघाडीला लोक निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देतील, असे ते ठामपणे म्हणाले. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय तिन्ही पक्ष एकत्र बसून घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.