इथे उपवराकडून घेतला जातो हुंडा..!
By admin | Published: December 6, 2015 02:21 AM2015-12-06T02:21:54+5:302015-12-06T02:21:54+5:30
हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेचे आपल्या देशात पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. मुलगी सुंदर, शालीन, उच्चशिक्षित असली तरी लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी किती रुपये मोजावे लागतील, याचा
- जयदेव वानखडे, जळगाव जामोद (बुलडाणा)
हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेचे आपल्या देशात पूर्णपणे उच्चाटन झालेले नाही. मुलगी सुंदर, शालीन, उच्चशिक्षित असली तरी लग्नाच्या वेळी हुंड्यासाठी किती रुपये मोजावे लागतील, याचा नेम नसतो. बहुतांश मुलींच्या आई-वडिलांना ही चिंता सतावत असते. मात्र आदिवासी समाजात चित्र अगदी उलट आहे. या समाजात मात्र मुलींना महत्त्व दिले जाते. त्यामुळे मुलीऐवजी मुलाच्या आई-वडिलांना हुंड्याची सोय करावी लागते. या आदिवासी कुटुुंबांमध्येही मुला-मुलींच्या पसंतीला महत्त्व असते; मात्र या पसंतीनंतरही पंचायतने ठरवलेली रक्कम उपवर मुलाकडून मुलीच्या वडिलांना द्यावीच लागते. ही रक्कम साधारणत: १५ हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत असते. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या या आदिवासींची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात उपवर युवक आहेत, त्यांना हुंड्याविषयी कमालीची चिंता असते. उपवर मुलगे-मुलींचे पसंतीच्या जोडीदारासोबत पळून जाण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडतात. ही गोष्ट लपून राहत नाही. कुणाची मुलगी आणि कुणाचा मुलगा पळून गेले, हे काही दिवसांतच कळते. एकदा ही माहिती मिळाली की, दोन्ही कुटुंबांकडे मोजके नातेवाईक आणि गावातील प्रमुख पंच यांची बैठक भरते. मुलीच्या वडिलांना किती रक्कम द्यावी, हे या वेळी मुलाच्या वडिलांना सांगितले जाते. ठरलेल्या रकमेचा काही वाटा त्याच वेळी मिळतो, तर उर्वरित रकमेसाठी ठरावीक मुदत दिली जाते. ही रक्कम एक लाखापेक्षा जास्त असल्यास मुलाच्या आई-वडिलांना साल, महिन्याने मजुरी करून रकमेची फेड ठरावीक मुदतीत करावी लागते. वेळप्रसंगी उपवर मुलगासुद्धा त्यांच्याकडे वर्षभर मजुरी करून ठरलेल्या रकमेची फेड करतो. दुसरे लग्न असल्यास खर्च जास्त एखाद्या तरुणाचे दुसऱ्यांदा लग्न असेल, तर त्याला इतरांपेक्षा जास्त रक्कम मुलीच्या वडिलांना द्यावी लागते. ही रक्कम कधीकधी २ लाखांपर्यंतही असते. जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या हनवतखेड, इस्लामपूर, रायपूर, गारपेठ, उमापूर, हेलापाणी, भालांजन, चारबन, निमखेडी, भिंगारा, गोमाल, चाळीसटापरी, कडुपट्टा, मेंढामारी, गोरक्षनाथ, सोनबडी, बांडा पिंपळ, ईसई, शिवणी आदी गावांमध्ये कोरकू, भिल्ल, निहाल, बारेला, भिलाला, धानके या आदिवासी जमातींचे लोक राहतात. या जमातींमध्ये लग्नाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत; मात्र हुंडा सर्वच जमातींमध्ये आढळून येतो. आदिवासींमध्ये अनेक जण या प्रथेविरुद्ध बोलताना दिसतात; मात्र सहसा कुणी उघड-उघड विरोध करण्याची हिंमत दाखवत नाही. आम्ही यासाठी प्रयत्न केले, पण कुणी साथ देत नाही. आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना शिक्षण देणे हाच यावरील उपाय आहे. - केशरसिंह राऊत, जळगाव जामोद