इथे दहा रुपयांत मिळते पोटभर पुरी-भाजी !
By Admin | Published: July 22, 2016 01:41 PM2016-07-22T13:41:55+5:302016-07-22T14:08:55+5:30
हल्ली दहा रुपयांत काय मिळते? गरिबांचा मानला जाणारा साधा वडापावही आता दहा रुपयांत मिळत नाही.
पोटाला मिळतो आधार : ‘अतिथी’ संस्थेच्या माध्यमातून नाशकात केंद्र
- धनंजय वाखारे
नाशिक, दि. २२ - हल्ली दहा रुपयांत काय मिळते? गरिबांचा मानला जाणारा साधा वडापावही आता दहा रुपयांत मिळत नाही. परंतु भुकेलेल्यांच्या वितभर पोटात थोडेफार अन्न जाऊन किमान त्याला तरतरी-ऊर्जा मिळावी, या उदात्त हेतूने सातपूर कॉलनीतील ‘अतिथी’ या उपाहारगृहाने कष्टकऱ्यांसाठी ना नफा- ना तोटा या तत्त्वावर ‘दहा रुपयांत पुरी-भाजी’ उपलब्ध करून दिली आहे. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या संकल्पनेतून महापालिका स्थायी समितीचे सभापती सलीम शेख (मामू) यांनी सुरू केलेले हे पुरी-भाजी केंद्र आता कष्टकऱ्यांबरोबरच उच्च मध्यमवर्गीयांसाठीही सकाळच्या नास्त्याचे ठिकाण बनले आहे.
माजी मंत्री आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शहरातील मान्यवरांच्या सहभागातून ‘अतिथी’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि कष्टकरी-मजूरवर्गाला अल्पदरात नास्ता व पोटभर भोजन उपलब्ध करून देता येईल काय, यावर बराच खल झाला. त्यातूनच दहा रुपयांत पुरी-भाजी उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आली आणि त्याचे पहिले केंद्र सातपूर कॉलनीत सुरू करण्यासाठी सलीम शेख यांनी पुढाकार घेतला. सातपूर परिसरात शेख कुटुंबीय सामाजिक सेवेत गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत आहे. हॉटेल व्यवसायात असलेल्या सलीम शेख यांनी वर्षभरापूर्वी ‘अतिथी’ या पुरी-भाजी केंद्राची सुरुवात केली. दहा रुपयांत पुरी-भाजी तर द्यायची परंतु त्याच्या दर्जाबाबत कुठेही तडजोड करायची नाही, हा निर्धार सलीम शेख यांनी सुरुवातीपासून केला तो आजतागायत आहे. पुरी-भाजी केंद्रात पीठ मळण्यापासून ते बटाटा सोलून त्याचे काप करेपर्यंत अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहे. पुरी-भाजीसाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरले जाते. पुऱ्या तळण्यासाठीही तपमान नियंत्रित करणारी आॅटोमॅटिक भट्टी आहे. त्यामुळे खरपूस पुरी ग्राहकांना उपलब्ध करून देणे सहज साध्य होते. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत या केंद्रात पुरी-भाजी उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत ३५ रुपयांत पोटभर जेवण (दोन भाज्या, डाळ-भात आणि चार पोळ्या) तयार असते. दहा रुपयांत पाच पुऱ्या आणि त्यात बटाट्याची भाजी यामुळे भरपेट नास्ता होत असल्याने सकाळी चार तासांत रोज सुमारे ३०० ते ३५० लोक या सेवेचा लाभ घेत असतात. पार्सल सेवाही उपलब्ध असल्याने त्यालाही औद्योगिक वसाहतीतून चांगला प्रतिसाद असतो. सलीम शेख यांनी पुरी-भाजी केंद्राच्या माध्यमातून सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे पुरी-भाजी केंद्रात स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आल्याने उच्च मध्यमवर्गीयांमध्येही या केंद्राचे आकर्षण वाढले आहे. सलीम मामूच्या या सेवेची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे राज ठाकरे, खासदार राजू शेट्टी, सुप्रिया सुळे आदिंसह अनेक मान्यवरांनी घेतली आहे.
उत्तमोत्तम सेवा देण्याचा आग्रह
तेलाचे भडकलेले भाव पाहता कष्टकऱ्यांच्या पोटात पुरेसे तेल जात नाही. त्यामुळे शुद्ध तेलाचा वापर करून पुऱ्या तयार केल्या जातात. गरीब असो श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वांना उत्तमोत्तम सेवा मिळाली पाहिजे, हा माझा आग्रह असतो. दुपारचे जेवणही चांगल्या वेष्टनात उपलब्ध करून दिले जाते. सदर केंद्राचा विस्तार वाढण्यासाठी महापालिकेकडे जागांची मागणी केली आहे. प्रामुख्याने मार्केट यार्ड, जिल्हा रुग्णालय, मध्यवर्ती बसस्थानक आदि परिसरात अल्पदरातील हे केंद्र सुरू करण्याचा मनोदय आहे.
- सलीम शेख, संचालक, अतिथी उपाहारगृह