वारसा व्यक्तिचित्रणाचा!
By admin | Published: July 17, 2016 12:41 AM2016-07-17T00:41:17+5:302016-07-17T00:41:17+5:30
महाराष्ट्राला लाभलेला कलेचा वारसा नवा नाही. मात्र, त्यातही ‘व्यक्तिचित्रण’ हा कलाप्रकार काहीसा दुर्लक्षिलेला, परंतु या कलाप्रकारालाही १००हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. काही दिग्गज
- स्नेहा मोरे
महाराष्ट्राला लाभलेला कलेचा वारसा नवा नाही. मात्र, त्यातही ‘व्यक्तिचित्रण’ हा कलाप्रकार काहीसा दुर्लक्षिलेला, परंतु या कलाप्रकारालाही १००हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. काही दिग्गज कलाकारांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेल्या व्यक्तिचित्रणाच्या कलाकृतींचा वारसा आजही कानाकोपऱ्यातील नवोदितांना कलेची शिकवणूक देतो आहे.
व्यक्तिचित्रणाची परंपरा उलगडणारे ‘द पोट्रेट शो’ हे समूह चित्र-शिल्प प्रदर्शन वांद्रे येथील बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कलादालनात सुरू आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला १२५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सुरू या विशेष कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हल्लीच्या ‘क्लिक’च्या जमान्यातील ही तासन्तास बसून, कॅनव्हासवर रेखाटलेली व्यक्तिचित्रे कलारसिकांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीची कलाकाराने साकारलेली प्रतिमा म्हणजे ‘व्यक्तिचित्र’. व्यक्तिचित्र हे चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात येते. या व्यक्तिचित्रणात काळानुरूप झालेले स्थित्यंतर येथे अनुभवण्यास मिळतात. व्यक्तिचित्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती व शैली निर्माण होत गेल्या. व्यक्तिचित्रणातून इतिहास, तत्कालीन समाजजीवन इत्यादींसंबंधी माहिती मिळते, हे महत्त्वाचे आहे.
आपल्याकडील ‘व्यक्तिचित्रण’ या कलाप्रकाराचा वेध घेतला, तर १८ व्या शतकात ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीद्वारा अनेक ब्रिटिश व इटालियन चित्रकार भारतात आले. त्यांच्यामुळे तैलरंगातील व्यक्तिचित्रण लोकप्रिय झाले. सवाई माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत पुण्यातील शनिवार वाड्यात जेम्स वेल्सने पेशव्यांच्या विनंतीवरून भारतातील पहिले कलाविद्यालय १७९० मध्ये चालू केले. त्याच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांत गंगाराम तांबट हा चित्रकार प्रसिद्धीस आला. मात्र, १७९५ मध्ये जेम्स वेल्सच्या निधनामुळे हे विद्यालय बंद पडले. त्याच्या हातची पेशवे सवाई माधवराव, नाना फडणीस, महादजी शिंदे वगैरेंची व्यक्तिचित्रे गणेशखिंड येथे होती. कंपनी सरकारच्या काळात ब्रिटिश व युरोपीय चित्रकार चिनारी, थिओडोर जेन्सन, रेनाल्डी इ.नी देशात अनेक व्यक्तिचित्रे रंगविली. १९व्या शतकाच्या मध्यापासून देशात विविध ठिकाणी कलाविद्यालये स्थापन झाली व त्यातून ब्रिटिश चित्रकारांनी वास्तववादी शैलीच्या व्यक्तिचित्रणाचे धडे दिले.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिग्गजांसोबतच नवोदित कलाकारांच्या कलाकृतींना व्यासपीठ मिळाले आहे. त्यात बाबुराव पेंटर यांच्या व्यक्तिचित्रे लक्षवेधी आहेत. शिवाय, गोपाळ देऊसकर, जी. एस. हळदणकर, वासुदेव कामत, ए. ए. भोसले, देवदत्त पाडेकर, एम. आर. आचरेकर, राजा रवी वर्मा, प्रफुल्ला सावंत, सुहास बहुळकर, रवी परांजपे, स्नेहल पागे यांच्या कलाकृतींचा न्याहाळण्याची पर्वणीही कलारसिकांना मिळत आहे. याशिवाय, नवोदित कलाकारांमध्ये किशोर ठाकूर, अक्षय पै, अमोल टाकळे, मदन गर्गे, प्रमोद कांबळे, मंजिरी मोरे, जी.बी. दीक्षित, गणेश हिरे यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, केवळ कला आस्वादापर्यंत हे मर्यादित नसून, प्रदर्शनादरम्यान कलेचे प्रात्यक्षिक, बारकावे यांचीही माहिती मिळते. कला क्षेत्रातील व्यक्तिचित्रणाचा प्रदीर्घ प्रवासाचा साक्षीदार होण्याची संधी बॉम्बे आर्ट सोसायटीने उभरत्या कलाकारांना दिली आहे. या प्रदर्शनाद्वारे व्यक्तिचित्रणातील नव्या आयामांना स्वीकारण्याचे आव्हान कलाक्षेत्रासमोर आहे. या माध्यमातून भविष्यातील कला क्षेत्र अधिकाधिक सक्षम होईल, ही आशा आहे.