नायक बदलला तरी पटकथा तीच!
By admin | Published: February 24, 2015 02:29 AM2015-02-24T02:29:25+5:302015-02-24T02:29:25+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याबद्दल शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले
मुंबई : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सापडत नसल्याबद्दल शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले आहे. नायक बदलला तरी पटकथा तीच असल्याची टीका करताना सिस्टीम ही उधळणाऱ्या घोड्यासारखी असते त्यावर घट्ट मांड ठोकून बसेल तोच राज्य चालवेल, अशा शब्दांत फडणवीस यांच्या क्षमतेवरच शिवसेनेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
या हत्ये प्रकरणात अद्याप आरोपी सापडत नसल्याबद्दल गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून लक्ष्य केले आहे. पोलिसांनी ताकद लावली तर पानसरे यांचे मारेकरी पकडण्यात निश्चित यश मिळेल हे मुख्यमंत्र्यांचे विधान गमतीचे आहे. ज्या पोलिसांवर ते अविश्वास दाखवीत आहेत ते गृहखाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळत आहेत. पानसरे यांचे खुनी शोधण्यात पोलीस चालढकल करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते गृहखात्याचे अपयश आहे.
अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याआधी त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करा. आत्मचिंतन करा असे आम्ही सुचवणार नाही. कायदा व सुव्यवस्था हा विषय चिंतनाचा नसून कृतीचा आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. सरकार बदलले पण महाराष्ट्रात काय बदलले हा प्रश्न जनता आपल्याला विचारणार आहे, याची जाणीवही करून देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)