हेक्स सिटीशी भुजबळ कुटुंबीयांचा संबंध नाही
By admin | Published: November 17, 2015 01:43 AM2015-11-17T01:43:40+5:302015-11-17T01:43:40+5:30
हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यातील हेक्स वर्ल्ड कंपनीत माजी मंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक आहेत.
नवी मुंबई : हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यातील हेक्स वर्ल्ड कंपनीत माजी मंत्री छगन भुजबळ, त्यांचे चिरंजीव पंकज आणि पुतणे समीर हे संचालक आहेत. परंतु हेक्स सिटी प्रकल्पाशी भुजबळ कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा हेक्स कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सदन बांधकाम आणि कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) भुजबळ यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत भुजबळ संचालक असलेल्या हेक्स वर्ल्ड कंपनीच्या खारघर येथील १६0 कोटींच्या जमिनीवर ईडीने टाच आणली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी पनवेल येथे उभारण्यात येत असलेल्या हेक्स सिटी प्रकल्पाशी भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असे हेक्स कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. हेक्स सिटी हा सुप्रीम कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीचा प्रकल्प आहे. डॉ. एल. एस. चंदानी आणि एम. एम. कांचनवाला हे या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे हेक्स वर्ल्ड आणि हेक्स सिटी या दोन कंपन्यांचा परस्पर कोणताही संबंध नाही. हे दोन्ही प्रकल्प वेगवेगळे असल्याने छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांचा हेक्स सिटी प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.