अहो, आश्चर्यम...मंत्री बसेचिनात!
By admin | Published: October 7, 2016 06:10 AM2016-10-07T06:10:46+5:302016-10-07T06:10:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी मंत्रालयातील ‘उपस्थिती’साठी वेळापत्रक आखून दिले असले
अतुल कुलकर्णी, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसाठी मंत्रालयातील ‘उपस्थिती’साठी वेळापत्रक आखून दिले असले, तरी भाजपा-शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्याकडे पाठ फिरवून ‘दांडी’ मारण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. आठवड्यातून एकदा मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईत आलेले मंत्री एक-दोन दिवस थांबून गावचा रस्ता धरत असल्याने मंत्रालय अक्षरश: ओस पडले आहे.
मंत्रालयातील उपस्थितीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवड्याचे वेळापत्रकच सर्व मंत्र्यांना पाठवले व त्यावर त्यांचा अभिप्राय मागविला. परंतु अद्याप एकाही मंत्र्याने आपले मत मुख्यमंत्र्यांना कळविलेले नाही. मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक तयार करुन देण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली वेळ. मंत्र्यांना वेळापत्रक तयार करुन द्यावे लागते आणि मंत्रालयात बसा, असे सांगावे लागते यातच सगळे आले! असे वेळापत्रक तयार करुन देण्यामागे फडणवीस यांचा हेतू चांगला असला तरी तो मंत्री पाळायला तयार नाहीत, असे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसाचे अंदाजित वेळापत्रक तयार करुन दिले. त्यात कोणत्या कामासाठी किती वेळ द्यावा हे देखील त्यांनी नमूद केले.
अनेक मंत्री सोमवारी सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचतात. मंगळवारचा दिवस मंत्रिमंडळ बैठकीत जातो आणि बुधवारी दुपारनंतर अनेकजण आपापल्या मतदारसंघात जायला निघतात. दोन दिवसाच्यावर कोणीही मंत्रालयात थांबायला तयार नसते. अनेक मंत्री तर घरी बसूनच काम पाहातात. अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलवले जाते. काही मंत्री तर ट्रॅकसूट घालून बैठका घेतात, अशी अधिकाऱ्यांची तक्रार आहे. पूर्वी मंत्र्यांच्या दालनात गर्दी असायची आता ती गर्दी बंगल्यांवर होताना दिसते आहे. काहींना तर आपल्या दालनापुढे झालेली गर्दी आजही कौतुकाचा विषय वाटते. तर काही मंत्री दिलेल्या वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशिरा येतात, असेही काही अधिकाऱ्यांचे मत आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्र्यांनी वेळापत्रक तयार केले, पण त्यालाही मंत्री दाद देईनासे झाले आहेत. आघाडी सरकारच्या काळात सगळ्यात जास्तवेळ मंत्रालयात बसणारे मंत्री म्हणून आर.आर. पाटील आणि सुरेश शेट्टी यांचा नंबर होता तर सर्वात कमी काळ मंत्रालयात येणारे मंत्री म्हणून मनोहर नाईक यांचा नंबर आला होता.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले वेळापत्रक असे -
वारअंदाजे वेळकार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप
सोमवार१० ते १२शासकीय कामकाज
१२ ते १२-३०प्रधान सचिवांच्या भेटीसाठी
१२-३० ते १३-३०सचिव, विभागप्रमुख आदींसाठी राखीव
१४-०० ते १६-००विभागाशी संबंधीत बैठका, महत्वाच्या
धोरणविषयक बैठका
१६-०० ते १७-००सर्वसाधारण जनतेच्या भेटीसाठी
मंगळवार११-०० ते १४-००मंत्रीमंडळ बैठक
१४-०० ते १७-००मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार
बुधवार११-०० ते १७-००- खासदार, आमदारांनी उपस्थित केलेले
प्रश्न, विकास कामे संबंधी बैठका
- प्रशासकीय विभागाच्या संविधानिक
बैठका, धोरणात्मक व प्रशासकीय बैठका
गुरुवार११-०० ते १४-००प्रशासकीय विभागाच्या संविधानिक व धोरणात्मक विषयाच्या बैठका
शुक्रवार लोकप्रतिनिधी, शासकीय संस्था, इतर
ते रविवार संस्था, यांनी मागणी केलेले दौरे,
राजकीय बैठका, उद्घाटने, शुभारंभ