हे मायेपोटी की...? दावणीच्या रेड्याने घेतला मालकाचाच जीव, हिंगोलीतील मन हेलावणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 08:01 AM2018-03-11T08:01:58+5:302018-03-11T08:07:38+5:30
विशेष म्हणजे, शेतक-याच्या मृतदेहापासून तो हटायला तयार नव्हता आणि कोणाला जवळही येऊ देत नव्हता.
गोरेगाव (जि. हिंगोली) : दहा वर्षांपासून सांभाळलेल्या दावणीच्या रेड्यानेच जोराची धडक देऊन शिंगे पोटात खुपसल्याने शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, शेतक-याच्या मृतदेहाशी तासभर हा रेडा झुंजत होता. मृतदेहापासून तो हटायला तयार नव्हता आणि कोणाला जवळही येऊ देत नव्हता. त्यामुळे शेकडो गावक-यांना हताशपणे हे सर्व पाहण्यापलीकडे काही करता आले नाही.
सेनगाव तालुक्यातील चोंढी बु. येथे शनिवारी दुपारीस दोनच्या सुमारास ही घटना घडली. प्रल्हाद रामजी नानवटे (५०) असे मृत शेतक-याचे नाव आहे. नानवटे यांच्याकडे गायी-म्हैशी मोठ्या प्रमाणात होत्या; परंतु वाढत्या चारा टंचाईमुळे त्यांनी त्या सर्व विकून टाकल्या आणि केवळ हा रेडाच दावणीला ठेवला. गेल्या दहा वर्षापासून ते त्याचा सांभाळ करीत होते. नानवटे कुटुंब रेड्याचे नियमित चारा-पाणी करीत असत. विशेष करुन मृत प्रल्हाद यांनी रेड्याला खूप जीव लावला होता.
हे मायेपोटी की...?
रेड्याच्या धडकेने मयत प्रल्हाद यांचे हाडन् -हाड मोडले होते. धडक दिल्यानंतर रेडा पार्थिवाशी मायेपोटी झुंजत होती की त्याचा राग अनावर झाला होता, हे कळायला मार्ग नव्हता. रेड्याने धडक का दिली असेल, याबद्दल विविध शक्यता गावकरी व्यक्त करीत होते.
दोन लाखांनाही नाही विकला...
ह्या रेड्याला काही दिवसांपूर्वी दोन लाखांना मागणी आली होती. परंतु प्रल्हादरावांनी रेड्याला लावलेल्या मायेपोटी त्याची विक्री केली नव्हती. आज त्याच रेड्याने त्यांचा जीव घेतल्याने गावकरी अचंबित झाले होते. ही कसली आली माया...असा भाव प्रत्येकाच्याच चेह-यावर होता.