अहो आश्चर्यम्! सर्व उमेदवार ‘बीए पास’!
By admin | Published: February 7, 2017 12:12 AM2017-02-07T00:12:28+5:302017-02-07T00:12:28+5:30
राज्य निवडणूक आयोगाच्या डुलक्यांमुळे झालेल्या गोंधळात आणखी एक भर पडली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला प्रत्येक उमेदवार ‘डॉलरपती’ तर झाला.
योगेश पांडे, नागपूर
राज्य निवडणूक आयोगाच्या डुलक्यांमुळे झालेल्या गोंधळात आणखी एक भर पडली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेला प्रत्येक उमेदवार ‘डॉलरपती’ तर झाला. मात्र याहून पुढे जात कागदोपत्री सर्वच उमेदवार ‘बीए पास’देखील झाल्याची बाब समोर आली आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत संकेतस्थळावर दर्शविण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रात विसंगत माहिती दिसून येत आहे. निवडणुकांची पूर्वतयारी करताना आयोगातर्फे सर्व तांत्रिक बाबींची शहानिशा करण्यात आली नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने यंदा मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याच्या पद्धतीत बदल केला व उमेदवारांना ‘आॅनलाइन’ नोंदणी करून अर्ज भरणे अनिवार्य केले. उमेदवारांनी दाखल केलेल प्रतिज्ञापत्र निवडणुकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील प्रतिज्ञापत्रांवर नजर टाकली असता शैक्षणिक अर्हतेबाबत प्रत्येक उमेदवारांत एक साम्य दिसून येत आहे. उमेदवाराचे शिक्षण कितीही झाले असले तरी सारांश माहितीमध्ये प्रत्येकाच्या शिक्षणासमोर ‘बीए’ असेच नमूद करण्यात आले आहे. याबाबत काही उमेदवारांशी संपर्क केला असता त्यांनी योग्य शिक्षण नमूद केल्याचे सांगितले. प्रतिज्ञापत्रात तसे दिसूनदेखील येते. मात्र सारांश तपशिलामध्ये सर्वांचे शिक्षण सारखेच दाखविण्यात येत आहे.
सहारिया म्हणतात, ‘नो आयडिया’
सुरुवातीला ‘डॉलरपती’ व आता ‘बीए पास’ या दोन्ही गोंधळासंदर्भात उमेदवारांकडून विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनीदेखील याबाबत आश्चर्य व्यक्त केले. संबंधित प्रकाराबाबत काहीही माहिती नसून याचे तपशील घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चूक ‘सॉफ्टवेअर’मधील चुकीच्या ‘फिडिंग’मुळे झाली आहे. मात्र नेमकी तांत्रिक चूक कुठे व कुणामुळे झाली याबाबत आयोगातील एकाही अधिकाऱ्याने भाष्य केले नाही. जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली नाही.
वकील-डॉक्टरांचे ‘डिमोशन’
प्रस्तुत प्रतिनिधीने विविध प्रभागांमधील वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची चाचपणी केली.
अगदी नववी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराचे शिक्षणदेखील ‘बीए’ दाखविण्यात येत आहे.तर वकील-डॉक्टर व पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांचे चक्क ‘डिमोशन’ झाले असून, त्यांचे शिक्षणदेखील ‘बीए’च नमूद आहे.