हाय सिक्युरिटी नंबर प्लेट; वाहनांवरील ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ आता जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:10 AM2019-01-02T01:10:55+5:302019-01-02T01:13:09+5:30
राज्यात १ एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहेत. त्यामुळे ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे.
अमरावती : राज्यात १ एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहेत. त्यामुळे ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे. केंद्रीय परिवहन विभागाने मोटर वाहन अधिनियमांतर्गत २००५ मध्ये देशभरातील एचएसआरपीएफ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्येच तसा आदेश दिला होता. त्यानंतर १३ वर्षांनी राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आॅनलाइन ट्रॅकिंग शक्य
उच्च सुरक्षायुक्त प्लेट बसविल्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक वाहन पोलीस व परिवहन विभागाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅक करता येणार आहे. महिला सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
हॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक इंडिया लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम नव्या नंबर प्लेटवर राहील. आरटीओ वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळेल. याशिवाय दहा अंकी युनिक सीरियल नंबरही राहणार आहे.
वाहननिर्मात्यांचा विरोध
वाहनांच्या नंबर प्लेट कंपन्या बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक करून देतील, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता.