हायटेक टोळीकडून साडेदहा लाख हस्तगत
By admin | Published: September 23, 2014 01:04 AM2014-09-23T01:04:36+5:302014-09-23T01:04:36+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करुन विद्यार्थ्यांना गंडविणाऱ्या हायटेक टोळीकडून पोलिसांनी १० लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. अमरावती पोलिसांनी सोमवारी
अमरावती पोलिसांची पुण्यात कारवाई : वैद्यकीय प्रवेशासाठी गंडविल्याचे प्रकरण
अमरावती : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करुन विद्यार्थ्यांना गंडविणाऱ्या हायटेक टोळीकडून पोलिसांनी १० लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. अमरावती पोलिसांनी सोमवारी पुणे येथे ही कारवाई केली.
हिमाचल प्रदेशातील रहिवासी अविनाश चंदेल यानच्या मुलीचा येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याची बतावणी करुन त्यांच्याकडील २२ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी अमरावती पोलिसांनी हायटेक टोळीतील आदित्य रतनेश्वर झा (२८), अभिषेक सूर्यकांत कुमार (२६), पप्पू राजकुमार सिंग (२०), सुजितसिंग पीरेन्दरसिंग (२१, सर्व रा.मधुबनी, बिहार), दीपक दुर्गोनंद झा (२०, रा. दरभागा, बिहार) व सुरदेवसिंग लाबहादुर सिंग (२५, रा. लकीसराट, बिहार) या सहा आरोपींना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान त्यांनी वैद्यकीय प्रवेश करुन देण्याच्या नावावर गंडविलेली रोकड पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक गणेश पवार हे कर्मचाऱ्यांसह आरोपींना घेऊन पुणे येथे रवाना झाले होते. पोलिसांनी सोमवारी पुणे तेथील सोमवारपेठ परिसरातील सुयेश लॉज येथून १० लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. (प्रतिनिधी)