दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी हायटेक वाचनालय
By admin | Published: January 7, 2017 01:58 AM2017-01-07T01:58:52+5:302017-01-07T01:58:52+5:30
इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे माहिती मिळविणे ही आता कठीण गोष्ट नाही.
मुंबई : इंटरनेट आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे माहिती मिळविणे ही आता कठीण गोष्ट नाही. जगात कुठल्याही कोपऱ्यात बसून एका क्लिकवर सर्व माहिती सहज उपलब्ध होते. पण, सामान्य व्यक्तींना ही सहज सोपी वाटणारी बाब दृष्टिहीन व्यक्तींसाठी मात्र तितकीच अवघड असते. इंटरनेट वापरण्यास त्यांना अनेक अडचणी येतात. दृष्टिहीन व्यक्तींना माहिती शोधणे सोपे व्हावे म्हणून आयआयटी पवईतर्फे एक अद्ययावत वाचनालय सुरू करण्यात आले आहे.
आयआयटी मुंबईचे संचालक देवांग खखर यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. दृष्टिहीन विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात. त्यांना अभ्यासाची आवड असते, ते शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट करतात. पण, अनेकदा या विद्यार्थ्यांना अभ्यासाची संदर्भ पुस्तके, संशोधन सहज उपलब्ध होत नाही. कारण, पुस्तके हे विद्यार्थी वाचू शकत नाहीत. याचा विचार करून दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी खास अॅप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर तयार करण्यात आली आहेत. याआधारे विद्यार्थ्यांना माहिती, पुस्तके सहज उपलब्ध होणार आहे.
या वाचनालयात अत्याधुनिक स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. प्लेक्सटॉक पॉकेट डेसी आहे. हा छोटा प्लेअर आणि रेकॉर्डर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास मदत होणार आहे. ‘संगीता’ सॉफ्टवेअर आहे.
हे सॉफ्टवेअर या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. कारण, या सॉफ्टवेअरमुळे लेखी स्वरूपातील माहिती एमपी ३ प्लेअरमध्ये कनर्व्हट होते. कुठेही नेऊ शकतो असा स्कॅनर आणि रिडर आहे. अत्याधुनिक ब्रेलर या वाचनालयात उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींचा नक्कीच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
भविष्यात दृष्टिहीन विद्यार्थ्यांना यापेक्षा आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करण्यात येतील. अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, येथे प्रवेश घ्यावा, अशी आमची इच्छा असल्याचे खखर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)