इंटरनेटमुळे पीएमपी होणार ‘हायटेक’
By admin | Published: May 18, 2016 01:02 AM2016-05-18T01:02:06+5:302016-05-18T01:02:06+5:30
तब्बल ५० टक्के आयुर्मान संपलेल्या बसच्या भरवशावर पीएमपीचा कारभार सुरू
पुणे : तब्बल ५० टक्के आयुर्मान संपलेल्या बसच्या भरवशावर पीएमपीचा कारभार सुरू असला तरी, प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी पीएमपी प्रशासनाने कंबर कसली आहे.
पीएमपीच्या सर्व १२०० बसला जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर, पीएमपीचे सर्व डेपो आणि बसस्थानकांवर पुढील तीन महिन्यांत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या पुढे जाऊन येत्या सहा महिन्यांत प्रत्येक बसमध्ये प्रवाशांना मोफत वाय-फाय सुविधाही दिली जाणार आहे. त्यामुळे एकीकडे १० वर्षांहून अधिक वयोमान झालेल्या बसेसची सीट, खिडक्या, दरवाजे, काचा खिळखिळ्या झाल्या असल्या तरी प्रत्येक प्रवाशाला स्मार्ट फोनसाठी इंटरनेटची सुविधा मात्र खात्रीशीर उपलब्ध होणार आहे. पीएमपीच्या या १२०० बसमध्ये वाय-फाय मोफत उपलब्ध करून देण्यासाठी चीनच्या अल्ट्रा पॉवर सॉफ्टवेअर या कंपनीने पुढाकार घेतला असून कंपनीच्या शिष्टमंंडळाने सोमवारी (दि. १६) पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, लवकरच निर्णय होणार आहे.
>प्रत्येक बसमध्ये जीपीएस
पीएमपीकडून प्रत्येक बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यामुळे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचे नेमके ठिकाण समजण्यास मदत होणार आहे. या शिवाय प्रत्येक प्रवाशालाही बस ट्रँकिंग करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे घरबसल्या बसस्थानकावर बस कधी येईल, आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी किती वेळ लागेल, याची माहितीही एका क्लिकवर प्रवाशांना तसेच प्रशासनालाही मिळणे शक्य होईल.
>लवकरच मोबाईल अँप
पीएमपीकडून प्रवाशांसाठी मोबाईल अॅपही विकसित करण्यात आले आहे. या अॅपचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप पीएमपीच्या बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने ते सुरू करण्यात आलेले नाही. या अॅपमध्ये प्रवाशांना प्रत्यके बसची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. तसेच पीएमपी संबंधातील सूचना व तक्रारीही सहज आणि सोप्या स्वरूपाय करता येणार आहे. बहुतांश प्रवाशांकडे स्मार्टफोन असल्याने याचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याचा प्रशासनास विश्वास आहे.
>डेपो आणि स्थानके महिन्याभरात वाय-फाय
पीएमपीचे सर्व डेपो आणि स्थानके महिन्याभरात वाय-फाय होत आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले असून, स्वारगेट परिसरात तीन ठिकाणी ही इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, पुढील महिन्याभरात सर्व बीआरटी मार्ग तसेच वर्दळीच्या १२० स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली जाणार आहे.
प्रत्येक बसमध्ये वाय-फाय
पीएमपीकडून पुढील सहा महिन्यांत प्रत्येक बसमध्ये वाय-फाय सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी चीनच्या कंपनीने प्रशासनाशी चर्चा केली असून, प्राथमिक स्वरूपात याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीस प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, येत्या गुरुवारी (दि. १९) याबाबत पुन्हा बैठक होणार आहे. या कंपनीकडून ही सेवा मोफत पुरविली जाणार असून, सहा महिन्यांत १२०० बसेसमध्ये ती कार्यरत करणे शक्य असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक बसमध्ये प्रवाशाला मोफत इंटरनेट वापरता येणार आहे.