आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

By admin | Published: November 4, 2016 01:00 AM2016-11-04T01:00:22+5:302016-11-04T01:00:22+5:30

शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

Hi winter, health care | आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

आला हिवाळा, आरोग्य सांभाळा

Next


पुणे : शहरात मागील काही दिवसांपासून थंडी वाढत असून, सर्दी-खोकला आणि ताप यांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऋतूबदलाला सामोरे जाताना लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच डेंगी, चिकुनगुनिया आणि मलेरिया या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या काळातही हे संसर्गजन्य आजार आटोक्यात आले नाहीत. चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या आताही शहरात आणि राज्यात वाढत आहे. चिकुनगुनियामध्ये होणारी सांधेदुखी आणि त्यातच वातावरणाचा उतरलेला पारा यांमुळे रुग्णांना जास्त त्रास होण्याची शक्यता असल्याने या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोहन जोशी यांनी केले आहे.
डॉ. जोशी म्हणाले, की सांध्यांशी निगडित आजार तापमानात घट झाल्याने वाढतात. यातही हे आजार जुने असल्यास थंडीच्या दिवसांत रुग्णांना अधिकच त्रास होतो. त्यामुळे या रुग्णांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. चिकुनगुनियासारखा कोणताही संसर्गजन्य आजार ६ आठवडे राहतो; मात्र हे दुखणे त्याहून जास्त राहिल्यास इतर तपासण्या करणे गरजेचे असते. थंडीच्या दिवसांत उबदार कपडे वापरावेत तसेच थंडीपासून संरक्षण होईल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
थंडीच्या दिवसांत त्वचेचे त्रासही वाढत असल्याने कोरडी त्वचा असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. व्यायामासाठीही हा कालावधी चांगला असल्याने व्यायाम करण्यास सुरुवात करावी.
(प्रतिनिधी)
> चिकुनगुनियाच्या रुग्णांना अचानक पडलेल्या थंडीने त्रास होण्याची शक्यता असते. चिकुनगुनिया हा सांधेदुखीशी निगडित आजार असल्याने थंडीमध्ये शरीराचा रक्तपुरवठा कमी झाल्याने सांधेदुखीमध्ये वाढ होते. हालचाल न केल्यास हा त्रास आणखी वाढण्याची शक्यता असल्याने चिकुनगुनियासारखा आजार झालेल्यांनी थंडीच्या सुरुवातीला विशेष काळजी घ्यावी. अस्थमाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनीही थंडीच्या काळात काळजी घ्यावी, अशा रुग्णांना अचानक त्रास होऊ नये यासाठी त्यांनी जास्तीची औषधे जवळ बाळगावीत. धुरापासूनही काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. जयंत नवरंगे, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ
>थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे वापरा.
ताजा आणि पोटभर आहार घ्या.
नाक, कान यांतून हवा जाणार नाही याची काळजी घ्या.
दमा असणाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घ्यावी.
सर्दी असल्यास ती पसरणार नाही याची काळजी घ्या.
घसा खराब असेल तर गरम पाणी प्या तसेच गरम पाण्याच्या गुळण्या करा.
कफ आणि ताप दिर्घकाळ असेल तर अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hi winter, health care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.