भोंदुगिरीचे बिंग न फुटण्यासाठी अपहरण !
By admin | Published: May 12, 2015 02:01 AM2015-05-12T02:01:36+5:302015-05-12T02:01:36+5:30
भोंदुगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा,
अडरे/चिपळूण : भोंदुगिरीचे बिंग फुटू नये व माउलीच्या करिष्म्याचा भक्तगणांवर प्रभाव पडावा, शिवाय आपल्यापासून दूर गेलेला भक्त पुन्हा आपल्या प्रवाहात यावा, यासाठी ७ वर्षीय बालकाचे अपहरण केल्याची कबुली कापसाळ फणसवाडी येथील तथाकथित मठाधिपती वासंती कांबळी हिने दिली आहे. याप्रकरणी आणखी एका महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
कामथे हुमणेवाडी येथून प्रथम प्रकाश बाईत बुधवारी दुपारी घरातून बेपत्ता झाला होता. गुरुवारी कलावती आर्इंच्या मठात प्रश्नोत्तराच्यावेळी कामथे येथील महिलांनी प्रथम बेपत्ता झाला असल्याचे सांगितले. त्यावर वासंतीने मुलगा चार दिवसांत परत येईल आणि त्याला मीच सुरक्षित आणेन, असे सांगितले.
पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वासंतीसह परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल अलोरेचे शिक्षक मधुकर गणपती चिंदके पोलीस ठाण्यात बोलावले.
यावेळी त्यांनी काही काळ हंगामा करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी केली व रात्री चिंदके व वासंती कांबळी यांना उशिरा अटक केली. आपला भक्तसंप्रदाय वाढावा व प्रथमचे वडील पुन्हा प्रवाहात सामील व्हावेत, आपले बिंग कुठे फुटू नये यासाठी वासंतीने हे अपहरण नाट्य घडवून आणल्याची कबुली दिली. (प्रतिनिधी)