वासना नाही तर ते प्रेम होते! १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्याला उच्च न्यायालयाकडून जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 12:39 PM2024-01-14T12:39:21+5:302024-01-14T12:42:54+5:30
२६ वर्षीय आरोपीला जामीन मिळाला आहे.
प्रेम प्रकरणातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे ही वासना नसून ते प्रेम होते असे निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला जामीन मिळाला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी सांगितले की, संबंधित आरोपीने प्रेमसंबंधातून पीडितेसोबत संबंध ठेवले आहेत, त्यामुळे याला वासना म्हणता येणार नाही. तसेच है लैंगिक अत्याचाराचे प्रकरण नाही. दोघांनीही प्रेमसंबंधातून हे कृत्य केले होते.
१३ वर्षीय पीडित तरूणीच्या वडिलांनी आरोपी नितीन ढाबेरावविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता. चार वर्षांपूर्वी मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला. खरं तर २३ ऑगस्ट २०२० रोजी पीडित मुलगी पुस्तके आणण्यासाठी घरातून गेली पण घरी परतलीच नाही. त्यामुळे आपली मुलगी हरवली असल्याची तक्रार वडिलांनी केली. तक्रारीनंतर अल्पवयीन मुलीला शोधण्यात पोलिसांना यश आले. आरोपी नितीनचे आपल्यावर प्रेम असल्याची कबुली पीडितेने दिली होती. २२ ऑगस्ट रोजी ती तिच्या आजीच्या घरी गेली असता तिथे आरोपी नितीनने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते.
उच्च न्यायालयाकडून जामीन
दरम्यान, नितीनने लग्नाचे आश्वासन दिल्यानंतर पीडित तरूणी त्याच्यासोबत घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन निघून गेली. दोघांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन अनेक ठिकाणी मुक्काम केला. अल्पवयीन मुलीने ही माहिती दिल्यानंतर अमरावतीच्या सुर्जी पोलीस ठाण्यात आरोपी नितीनविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कोर्टात पोहचले, जिथे आरोपी नितीनच्या वकिलांनी अल्पवयीन तरूणी आरोपीसोबत स्वखुशीने गेली असल्याचे सांगत जामीनासाठी अर्ज केला. पण, अल्पवयीन मुलीची संमती नव्हती असे सांगत पीडितेच्या वकिलांनी जामीन फेटाळण्याची मागणी केली.
वासना नाही तर ते प्रेम होते!
याप्रकरणी सुनावणी देताना न्यायमूर्ती जोशी-फाळके यांनी सांगितले की, तपासाअंती असे स्पष्ट झाले की, पीडितेने स्वत:च्या इच्छेने घर सोडले होते. मित्राकडून पुस्तक घेण्याचा बहाणा करून ती घराबाहेर पडली अन् परतली नाही. तिने आरोपीसोबत राज्याची सीमा ओलांडली. तसेच पीडितेने तिच्या जबानीत आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. "पीडितेच्या सांगण्यावरून असे दिसते की, तिने आरोपीसोबत अनेक ठिकाणी मुक्काम केला पण कुठेही तक्रार केली नाही. एकूणच संबंधित पीडिता प्रेमप्रकरणातूनच आरोपीसोबत गेली होती हे स्पष्ट होते", असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
तसेच न्यायाधीशांनी सांगितले की, आरोपीला कारागृहात ठेवून काहीही साध्य होणार नाही... हे प्रकरण २०२० मधील असून प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्यास वेळ लागेल. आरोपी आणि पीडित तरूणी प्रेमप्रकरणातूनच एकत्र आले होते. याप्रकरणी आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. पण, आताच्या घडीला आरोपीला कोठडीत ठेवणे उचित ठरणार नाही.