हायपरसिटीला उच्च न्यायालयाचा दिलासा
By admin | Published: July 1, 2016 04:27 AM2016-07-01T04:27:02+5:302016-07-01T04:27:02+5:30
वाशीमधील इनआॅर्बिट मॉलमध्ये हायपरसिटीची शाखा बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही शाखा एका रात्रीत सील केली.
मुंबई : वाशीमधील इनआॅर्बिट मॉलमध्ये हायपरसिटीची शाखा बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असल्याने नवी मुंबई महापालिकेने ही शाखा एका रात्रीत सील केली. मात्र गुरुवारी उच्च न्यायालयाने एनएमएमसीच्या नोटीसला स्थगिती दिल्याने पुन्हा हायपरसिटीची शाखा ग्राहकांसाठी सुरू होणार आहे.
‘मॉलला एफएसआय मिळालेला आहे. या एफएसआयचा वापर व्यावसायिक कारणासाठी केला जाऊ शकतो. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या इनआॅर्बिट मॉलने महापालिकेकडून घेतल्या आहेत. महापालिका दावा करत असल्याप्रमाणे हायपरसिटी तळघरात नसून तळमजल्यावर आहे. त्यामुळे महापालिकेने बजावलेली नोटीस रद्द करावी,’ असा युक्तिवाद इनआॅर्बिट मॉलतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी केला. पालिकेने यावर आक्षेप घेतला. ‘पालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, तळघराचा वापर पार्किंग किंवा स्टोअररूमसाठी करण्याची परवानगी आहे. मात्र तळघराचा व्यावसायिक वापर करण्यास मनाई आहे. त्यामुळे मॉलकडे सर्व परवानग्या असल्या तरी तळघराचा वापर दोन गोष्टींकरिता मर्यादित आहे. डीसीआरचे उल्लंघन केल्याने महापालिकेने संबंधित आउटलेट सील केले,’ असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केला. ‘२००८ पासून हे सुरू आहे. तेव्हापासून तुम्ही काय करत आहात? परवानग्या तर तुम्हीच दिल्यात. एवढी वर्षे सुरू असलेली शाखा आता आणखी काही दिवस सुरू राहू द्या,’ असे म्हणत न्यायालयाने नोटिसीला स्थगिती देत ही याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवली. (प्रतिनिधी)