पंजाबी कॉलनीमधील इमारतींना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2017 02:19 AM2017-06-08T02:19:45+5:302017-06-08T02:19:45+5:30

पंजाबी कॉलनीमधील २५ इमारती धोकादायक असल्याने मुंबई महापालिकेने या इमारतींतील सुमारे १२०० कुटुंबीयांना फ्लॅट खाली करण्यासंदर्भात मेमध्ये नोटीस बजावली

High court temporary relief to buildings in Punjabi Colony | पंजाबी कॉलनीमधील इमारतींना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

पंजाबी कॉलनीमधील इमारतींना उच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायन-कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीमधील २५ इमारती धोकादायक असल्याने मुंबई महापालिकेने या इमारतींतील सुमारे १२०० कुटुंबीयांना फ्लॅट खाली करण्यासंदर्भात मेमध्ये नोटीस बजावली. उच्च न्यायालयाने महापालिकेला २२ जूनपर्यंत या इमारतींवर कारवाई न करण्याचे निर्देश बुधवारी दिले. परंतु, रहिवाशांना या इमारती पडल्यास तेच या दुर्घटनेला जबाबदार असतील, अशी हमी देण्यासही सांगितले.
महापालिकेने स्ट्रक्चरल आॅडिट करत पंजाबी कॉलनीतील २५ इमारती धोकादायक असल्याचे जाहीर केले. पावसाळ्यापूर्वी या इमारती खाली कराव्यात, अशी नोटीस संबंधित फ्लॅटधारकांना बजावली. या नोटीसला रहिवाशांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. याचिकेनुसार, या इमारती दुरुस्त होण्यासारख्या आहेत. मात्र महापालिका या इमारतींना धोकादायक जाहीर करून घरे खाली करण्यास सांगत आहे.
न्यायालयाने २२ जूनपर्यंत या इमारतींवर कारवाई न करण्याचे निर्देश महापालिकेला दिले. परंतु, पावसाळ्यात या इमारती कोसळून कोणतीही जीवितहानी व संपत्तीचे नुकसान झाल्यास त्याला केवळ रहिवासीच जबाबदार असतील, अशी हमीही रहिवाशांनी द्यावी. हमी न दिल्यास महापालिका कारवाई करण्यास मोकळी आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
२५ इमारतींपैकी काही इमारतींतील रहिवाशांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केल्याने उच्च न्यायालयाने या इमारतींच्या याचिकांवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली आहे. ज्या इमारतींतील रहिवाशांनी दावा दाखल केला नाही, अशा इमारतींच्या याचिकांवरील सुनावणी २२ जून रोजी ठेवली आहे.

Web Title: High court temporary relief to buildings in Punjabi Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.