अशोक चव्हाणांना दणका, आदर्श घोटाळ्यातून नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
By Admin | Published: November 19, 2014 11:45 AM2014-11-19T11:45:50+5:302014-11-19T12:19:04+5:30
आदर्श घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - आदर्श घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचे नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने चव्हाण यांना घोटाळा महागात पडण्याची चिन्हे आहेत.
आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून अशोक चव्हाण यांचे नाव वगळावे अशी याचिका सीबीआयने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन राज्यपालांनी चव्हाण यांची चौकशी करण्यास नकार दिल्याने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव वगळावे अशी सीबीआयची भूमिका होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यात नकार दिला. मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी व राजकीय नेत्यांनी लाटल्याचे उघड झाले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला व त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.