कर्करुग्ण रेल्वे कर्मचाऱ्यास हायकोर्टाचा दिलासा

By admin | Published: April 23, 2015 05:17 AM2015-04-23T05:17:04+5:302015-04-23T05:17:04+5:30

अन्याय्य आणि पक्षपाती पद्धतीने खातेनिहाय चौकशी करून मध्य रेल्वेने सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या आणि फुप्फुसाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या गौरी चंद्रा दत्ता

High Court's relief to Cancer Hospital | कर्करुग्ण रेल्वे कर्मचाऱ्यास हायकोर्टाचा दिलासा

कर्करुग्ण रेल्वे कर्मचाऱ्यास हायकोर्टाचा दिलासा

Next

मुंबई: अन्याय्य आणि पक्षपाती पद्धतीने खातेनिहाय चौकशी करून मध्य रेल्वेने सक्तीने सेवानिवृत्त केलेल्या आणि फुप्फुसाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात असलेल्या गौरी चंद्रा दत्ता या कर्मचाऱ्यास उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, हा कर्मचारी सन्मानाने निवृत्त झाल्याचे मानून त्यास संपूर्ण पेन्शन व अन्य निवृत्तीलाभ द्यावेत, असा आदेश दिला आहे.
गौरी चंद्रा दत्ता मध्य रेल्वेच्या बोरीबंदर येथील मुख्यालयात कार्यालय अधीक्षक होते. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या कार्यालयातील त्यांचे वरिष्ठ उदय वसंत बोभाडे यांना आॅफिसमध्ये अश्लील शिवीगाळ करणे व जिवे मारण्याची धमकी देणे तसेच जून २००० मध्ये तीन दिवस कामावर उशिरा येऊनही हजेरी पुस्तकात खाडाखोड करून वेळेवर आल्याची नोंद करणे अशा आरोपांवरून खातेनिहाय चोकशी करून त्यांना जुलै २००३ मध्ये पेन्शनमध्ये ३३ टक्के कपात करून सक्तीने सेवानिवृत्त केले गेले होते. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानेही यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर दत्ता यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका केली होती.
गेली सहा वर्षे प्रलंबित असलेली ही याचिका न्या. अनुप मोहता व न्या. के. आर. श्रीराम यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर मंजूर केली. पेन्शनमध्ये ३३ टक्के कपात करून दत्ता यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याचा रेल्वेचा निर्णय न्यायालयाने रद्द केला. परंतु फुप्फुसाचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याचे टाटा इस्पितळाचे ताजे प्रमाणपत्र दत्ता यांनी सादर केले व अशा अवस्थेत आपण पुन्हा कामावर जाण्याच्या स्थितीत नाही, असे दत्ता यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश न देता जुलै २००३ मध्ये ते नियमितपणे सेवानिवृत्त झाल्याचे मानून रेल्वेने त्यांना पूर्ण पेन्शन व अन्य निवृत्तीलाभ द्यावेत, असा आदेश दिला.
रेल्वेने दत्ता यांनी पेन्शन व अन्य सेवालाभांतील फरकाचे पैसे २००३ पासून आठ टक्के व्याजाने द्यावेत आणि दत्ता यांच्या प्रकृतीची स्थिती लक्षात घेता या पैशाचा हिशेब येत्या जूनपर्यंत पूर्ण करावा, असा आदेशही दिला गेला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: High Court's relief to Cancer Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.