एसटी महामंडळावर हायकोर्टाची नाराजी
By admin | Published: January 10, 2017 04:30 AM2017-01-10T04:30:11+5:302017-01-10T04:30:11+5:30
दारु पिऊन एसटी बस चालविणाऱ्या चालकास सेवेतून बडतर्फ न करता त्याला पगार कमी करण्याची फुटकळ शिक्षा देण्याच्या
मुंबई : दारु पिऊन एसटी बस चालविणाऱ्या चालकास सेवेतून बडतर्फ न करता त्याला पगार कमी करण्याची फुटकळ शिक्षा देण्याच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मवाळपणावर उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
औरंगाबाद खंडपीठावरील न्यायाधीश न्या. रवींद्र घुगे यांनी म्हटले की, ६० प्रवाशांची बसण्याची आणि २० प्रवाशांची उभे राहण्याची क्षमता असलेली एसटीची बस चालकाने दारु पिऊन चालविणे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बेशिस्त आहे. अशा चालकाने अपघात करून अशा चालकाने अपघात करून लोकांचा जीव घेईपर्यंत महामंडळाने वाट पाहणे अपेक्षित नाही. याआधीही गैरवर्तनाचे तब्बल ३६ प्रकार केलेल्या या चालकास बडतर्फ न करता त्याचा केवळ पगार कमी केला जावा, हे धक्कादायक आहे. नंदूरबारच्या शहादा आगारातील बसचालक रामदास सदाराव याने केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. घुगे यांनी हे मत नोंदविले. सिद्ध झालेल्या गैरवर्तनाच्या तुलनेत दिलेली शिक्षा खूपच कठोर आहे, हा सदाराव याचा युक्तिवाद फेटाळताना न्या. घुगे यांनी, अशा चालकास बडतर्फच केले जायला हवे होते, असे म्हटले. आपण दारु प्यायलो नव्हतो तर खोकल्याचे औषध घेतले, हा त्याचा बचावही अमान्य केला. (विशेष प्रतिनिधी)