राज्यात आज महास्वच्छता अभियान
By Admin | Published: December 13, 2015 01:09 AM2015-12-13T01:09:42+5:302015-12-13T01:09:42+5:30
रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रविवारी सकाळी सात वाजेपासून महत्त्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
अलिबाग : रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर रविवारी सकाळी सात वाजेपासून महत्त्वाकांक्षी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’चे स्वच्छतादूत तथा डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट येथे सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छता मोहिमेला उपस्थित राहणार आहेत. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक वर्षांपासून व्यापक स्वरूपात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात शहरांमध्ये व दुसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागांमध्ये अभियान राबविले जाईल. रविवारी १०० पेक्षा जास्त शहरातील रस्ते, पोलीस ठाणे, सरकारी कार्यालये, सरकारी मुख्यालय, बस स्थानके, रुग्णालये, समुद्रकिनारे स्वच्छ करण्यात करण्यात येणार आहेत. तीन लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश असलेली मानवी साखळी हे स्वच्छता अभियान यशस्वीपणे पार पाडणार आहे. (प्रतिनिधी)
स्वयंशिस्त, स्वच्छतेचा अंगीकार
राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून स्वच्छतेबाबत स्वयंशिस्तीचा अंगीकार केल्यास भारत जगातील सर्वात स्वच्छ आणि स्वच्छतेसाठी जागरूक देश म्हणून ओळखला जाईल, असा ठाम विश्वास डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केला आहे.
व्यापक मोहीम
महाराष्ट्रातील १४ महापालिका, २३ नगरपालिका (गुजरात-३, गोवा-१), ३४ नगरपरिषदा, ९ नगरपंचायती तसेच रायगड (१२), ठाणे (५), पालघर (२), नाशिक (२), जळगाव (१), पुणे (१), रत्नागिरी (१) जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये अभियान राबविले जाईल.