मोदींच्या ‘क्लास’साठी शाळांची धावपळ
By admin | Published: September 5, 2014 01:14 AM2014-09-05T01:14:32+5:302014-09-05T01:14:32+5:30
शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक,
कुठे ‘आॅल इज वेल’ तर कुठे जमवाजमव : विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता
नागपूर : शिक्षकदिनाच्या औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावे, असे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. ज्या शाळांमध्ये टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर यासारख्या गोष्टी अगोदरपासूनच उपलब्ध होत्या, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करून ठेवली आहे. परंतु साहित्य नसलेल्या शाळांनी सरकारी आदेशाचे पालन करण्यासाठी इकडून तिकडून साहित्य जमा करण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
सुमारे १०० दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी शिक्षकदिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे पावणेदोन तास ते देशभरातील सर्वच शाळकरी विद्यार्थ्यांशी संपर्क साधणार आहेत. पंतप्रधानांचा संदेश विद्यार्थ्यांना पाहता यावा यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दुपारी २.३० ते ४.४५ पाच या वेळेत एकत्रित जमवून कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश शिक्षण उपसंचालकांकडून शाळांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित शाळांमध्ये टीव्ही संच, संगणक यांची व्यवस्था नाही. अनेक शाळांत प्रक्षेपणाच्या मूलभूत सुविधा नाहीत. शिवाय अनेक ठिकाणी भारनियमन तसेच जागेचादेखील प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना एका ठिकाणी जमा करण्याइतकी जागा अनेक शाळांत उपलब्ध नाही. तरीदेखील शाळांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी शिक्षकांनी इकडून तिकडून साहित्याची जमवाजमव केल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
सर्व तयारी पूर्ण, शाळा सज्ज
नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण दाखविण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी आम्ही केली आहे. शिक्षकदिनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना एकत्रितपणे बसून भाषण ऐकता यावे यासाठी टीव्ही, केबल तसेच स्पीकरवगैरे सर्वच गोष्टी उपलब्ध आहेत, असे आर.एस. मुंडले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा चांगदे यांनी सांगितले.
शासन निर्देशाच पालन होणारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या शासनाच्या निर्देशांचे पालन करण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे. टीव्ही, रेडिओ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण दाखविण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी ही नक्कीच एक चांगली संधी राहणार आहे.
- मधुसूदन मुडे, मुख्याध्यापक, मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतन
हायटेक तयारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशासाठी शाळेतर्फे ‘हायटेक’ तयारी करण्यात आली आहे. एलसीडी, प्रोजेक्टर व संगणक यांचा यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनीच या गोष्टी ‘आॅपरेट’ करण्यासाठी विचारणा केली आहे. विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे व त्यांच्यात उत्साहदेखील दिसून येत आहे.
- विनय निमगावकर, मुख्याध्यापक, जामदार शाळा
रेडिओद्वारे ऐकणार भाषण
आमच्या शाळेत एकाच ठिकाणी मुलांना बसवणे थोडे अवघड जाईल. त्यामुळे टीव्ही किंवा प्रोजेक्टरच्या साह्याने त्यांना भाषण दाखवणे अडचणीचे ठरेल. परंतु वर्गखोल्यांमध्ये स्पीकरची व्यवस्था आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘एफएम’ रेडिओच्या माध्यमातून वर्गखोल्यांतच हा संदेश ऐकविल्या जाईल. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्येदेखील उत्साह आहे.
- विजय शाहाकार, मुख्याध्यापक, गजानन हायस्कूल
प्राथमिकपेक्षा माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना रस
नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. मुलांनादेखील याची सूचना देण्यात आली आहे. एलसीडी, स्पीकर या वस्तू शाळेत उपलब्ध आहेतच. विद्यार्थ्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे भाषण ऐकण्यात किती रस आहे व त्यांना ते किती समजेल, याबाबत साशंकता आहे. परंतु माध्यमिक व उच्च माध्यमिक इयत्तांमधील सर्वच विद्यार्थी हे भाषण ऐकतील.
- पल्लवी दाढे, मुख्याध्यापिका, सेंट झेव्हिअर्स स्कूल
इंटरनेटवरून दाखविणार भाषण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. आमच्या शाळेत प्रोजेक्टरची व्यवस्था आहे, शिवाय एकाच ठिकाणी विद्यार्थी बसू शकतील अशी सोयदेखील आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून प्रोजेक्टरच्या मदतीने स्क्रीनवर विद्यार्थ्यांना भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येईल.
- स्नेहल रोकडे, मुख्याध्यापिका, साईनाथ विद्या मंदिर
धावपळ झाली, तयारी पूर्ण
नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकवावे यासंदर्भात आदेश आल्यानंतर आम्ही तयारीला सुरुवात केली. शाळेत टीव्ही, एलसीडी, स्क्रीनवगैरे उपलब्ध होते. परंतु थेट प्रक्षेपणासाठी ‘डीटीएच’ केबल सुविधा नव्हती, शिवाय या सर्व साहित्याचे ‘टेस्टिंग’ करणेदेखील आवश्यक होते. यात थोडी धावपळ नक्की झाली. परंतु आता तयारी पूर्ण झाली आहे.
- विनीता बावर, मुख्याध्यापिका,
न्यू अॅपॉस्टॉलिक स्कूल