अतिवृष्टीचा भातपिकाला फटका
By admin | Published: July 22, 2016 01:07 AM2016-07-22T01:07:14+5:302016-07-22T01:07:14+5:30
आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले
डिंभे : मागील आठवड्यात आंबेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातखाचरांचे बांध वाहून गेले, तर नुकतीच उगवू लागलेली भातरोपे अतिवृष्टीमुळे सडून नुकसान झाल्याने यंदा आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे खोऱ्यांतील मोठे भातक्षेत्र लागवडीपासन वंचित राहणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्याच्या आदिवासी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. भीमाशंकर खोऱ्यातील गोहे, आहुपे व पाटण खोऱ्यांतील असाण, अडिवरे, पाटण, महाळुंगे, बेंढारवाडी येथील शेतकऱ्यांच्या भातखाचरांचे बांध फुटून ती वाहून गेली आहेत. तर पोखरी, फुलवडे, राजपूर, जांभोरी, तळेघर, कोंढवळ, आहपे, डोण, तिरपाड, न्हावेड, कोंढरे या भागात नुकत्याच उगवू लागलेल्या भातरोपांत पाणी साठल्याने कोवळी भातरोपे सडून गेली आहेत. यामुळे यंदा लागडीसाठी रोपेच उपलब्ध नसल्याने लागवड कशी करायची, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूणच भातक्षेत्रावर होणार आहे. यामुळे यंदा आंबेगाव तालुक्यातील भातक्षेत्र लागवडीपासून वंचित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पाटाने पाणी देऊन शेतकऱ्यांनी कशीबशी भातरोपे जगवली होती. मात्र, ऐन भातरोपे उगवण्याच्या काळातच तब्बल आठवडाभर पावसाने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात मुसळधार हजेरी लावली. भातखाचरे तुडुंब भरली. आठवडाभर रोपांतील पाणी काढून-काढून शेतकरी मेटाकुटीला आले, तरीही रोपांत तलावासारखी स्थिती निर्माण
झाली. यामुळे नुकतीच उगवू लागलेली कोवळी रोपे सडून गेली आहेत. तर, अतिवृष्टीमुळे भातखाचरांचे बांध फुटून भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची शेतकरी मागणी करू लागले असून, नुकसान
झालेल्या शेतीची भरपायी
मिळण्याची शेतऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे.
>५,५०० हेक्टर क्षेत्र : लागवड घटली
आंबेगाव तालुक्यात एकूण ५,५०० हेक्टर एवढे एकूण भातक्षेत्र आहे. या क्षेत्रावर तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून आहे. भातशेती हेच या भागातील शेतकऱ्यांचे एकमेव व मुख्य पीक आहे. मात्र, यंदा भातपेरणीपासूनच भातशेती संकटात सापडू लागली आहे. कशाबशा शेतकऱ्यांनी भातपेरण्या केल्या होत्या, त्या वेळी शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा होती तेव्हा पाऊस झाला नाही.