सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:44 AM2024-12-03T10:44:53+5:302024-12-03T11:24:42+5:30
मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली.
सोलापूर - माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची तयारी झाली होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झालं तर साहित्य जप्त करून गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांची चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया घेण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती परंतु प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावली तरीही ग्रामस्थ मतदानावर ठाम होते.
आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, आम्ही इथं मतदानाची प्रक्रिया पार पाडतोय, परंतु मतदान केल्यानंतर साहित्य जप्त होणार असेल, सगळे विस्कटलं जाणार असेल, त्यातून गोंधळ आणि झटापट होईल. किमान १५०० मतदान होईपर्यंत इथला निकाल येऊ शकत नाही. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदान होऊच द्यायचं नाही, साहित्य घेऊन जायचं यामुळे मतदान थांबवण्यात आलं आहे. येणाऱ्या ८-१० दिवसांत आम्ही प्रांत कार्यालय किंवा जिथे न्याय मागण्याचं ठिकाण असेल तिथे ताकदीने २५ ते ३० हजार लोकांचा आक्रोश पोहचवण्याचं काम करू. यात न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मारकडवाडीत जे मतदान होते त्यात १४०० मते मला आणि ५०२ मतदान समोरच्याला होणार होते. मी सगळा अभ्यास केला होता, मात्र समोरच्या उमेदवाराला १००३ मतदान दाखवण्यात आले आहे. ईव्हीएममुळे हे झाले आहे. या गावाचा आक्रोश होता, आम्ही दिलेले मत उत्तमराव जानकरांना न होता दुसऱ्याला कसं गेला हा प्रश्न गावकऱ्यांना होता. त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र पोलिसांनी जमावबंदीचे आदेश काढले. ही निवडणूक घेता येणार नाही असे आदेश काढले. एक मत टाकल्यावर साहित्य जप्त करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली मग न्याय मागायचा कसा असा सवाल आमदार उत्तमराव जानकर यांनी केला.
दरम्यान, ही प्रक्रिया साधी होती, सगळ्या महाराष्ट्राला ते चित्र जाणार होते. मीडियाच्या माध्यमातून लाईव्ह मतदान झालं होते. गावकऱ्यांना आधार देण्यासाठी मी इथं मुक्कामाला होतो. जे इथं घडले ते राज्यात घडलं. जाणीवपूर्वक या मतदानाला विरोध केला गेला. गाव स्वखर्चाने ही प्रक्रिया राबवत होतं, पोलीस बंदोबस्त मागवला नव्हता. प्रशासनाने अडवणूक केली आहे. २० दिवसांनी मते कशी ट्रान्सफर होतात ते दाखवू, या गावकऱ्यांना न्याय देऊ असंही आमदार जानकरांनी सांगितले आहे. उत्तम जानकर यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली.या बैठकीत अशा प्रकारे पोलिसांचा विरोध झाल्यास मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. पोलिसांना घाबरून मतदार मतदानाला येणार नाहीत. मतदान न झाल्यास कौल कळणार नाही. त्यामुळे विनाकारण पोलिसांसोबत संघर्ष होईल त्यामुळे ही प्रक्रिया मागे घेत कायदेशीर मार्गाने लढा देण्याची भूमिका यावेळी जानकर यांनी घेतली. त्यामुळे मारकडवाडी येथील बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया झाली नाही.