महिलेच्या ई-मेलनंतर मुंबईसह तीन विमानतळांवर हायअॅलर्ट
By admin | Published: April 17, 2017 03:28 AM2017-04-17T03:28:33+5:302017-04-17T03:28:33+5:30
विमान अपहरणाच्या शक्यतेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, मुंबईसह चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
मुंबई/नवी दिल्ली : विमान अपहरणाच्या शक्यतेची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, मुंबईसह चेन्नई व हैदराबाद विमानतळांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. २३ जणांच्या एका टीमकडून या विमानतळावरील विमानाचे अपहरण होऊ शकते, असा ई-मेल एका महिलने मुंबई पोलिसांना पाठवल्यानंतर, तिन्ही विमानतळांवर हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
विमानतळाच्या सुरक्षेशी संबंधित समन्वय समितीची बैठकही घेण्यात आली आहे. या तीन विमानतळांवर सुरक्षेच्या बाबतीत अधिक काळजी घेण्यात येत आहे. चेक इन आणि सुरक्षेशी संबंधित इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एका महिलेने ई-मेल करून यासंबंधीची माहिती मुंबई पोलिसांना कळविली आहे. त्यानंतर, युद्धपातळीवर सतर्कता बाळगली जात आहे. सहा तरुणांची मुंबई, चेन्नई व हैदराबाद येथून विमान ‘हायजॅक’ करण्यासंबंधी चर्चा सुरू होती, अशी माहिती या महिलेने पोलिसांना दिली आहे. त्याबाबतची सत्यता पडताळली जात आहेत. तीन विमानतळांवर योग्य खबरदारी घेण्यात आल्याचे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयआरएफ) महासंचालक ओ. पी. सिंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तिन्ही विमानळावरून एकाच वेळी विमानाचे अपहरण केले जाईल. त्यासाठी एकूण २३ जणांचे पथक कार्यरत आहे. अपहरण करून हल्ला घडविण्याचा त्यांचा कट असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समजले, अशी माहिती संबंधित महिलेने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे विमानतळासह मुंबईतील सर्व प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याबाबत स्थानिक पोलिसांनाही खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.