विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दालने खुली
By admin | Published: February 9, 2017 03:23 AM2017-02-09T03:23:32+5:302017-02-09T03:23:32+5:30
फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)चे विद्यार्थीही आता पुढील काळात एमफिल किंवा पीएचडी करू शकणार आहेत
पुणे : फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)चे विद्यार्थीही आता पुढील काळात एमफिल किंवा पीएचडी करू शकणार आहेत. संस्थेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला मास्टर डिग्रीचा दर्जा मिळाल्याने उच्च शिक्षणाचे नवे दालन विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आहे. या निर्णयामुळे एफटीआयआयच्या शैक्षणिक इतिहासाला एक नवीन आयाम मिळाला आहे.
सध्या एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर पदविका (डिप्लोमा) ही पदवी मिळते. मात्र, त्याला मास्टर्सचा दर्जा नसल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मर्यादा येत आहेत. विद्यार्थ्यांना संशोधन आणि पीएच.डी सारखी उच्च शिक्षणाची अनेक दालने खुली व्हावीत, यासाठी एफटीआयआयच्या दोन किंवा तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला मास्टर्स डिग्रीचा समकक्ष दर्जा देण्यात यावा यासाठी एफटीआयआय प्रशासनाचे २०११ पासून प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना सहा वर्षांनंतर यश आले आहे. संस्थेच्या सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, डायरेक्शन अँड स्क्रिन प्ले रायटिंग, साऊंड रेकॉर्डिंग अँड साऊंड डिझाईन, आर्ट डायरेक्शन अँड प्रॉडक्शन डिझाईन आणि अॅक्टिंग या अभ्यासक्रमांना हा मास्टर डिग्रीचा दर्जा मिळाला आहे. २०१६ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)