ज्येष्ठ नागरिकांविरुद्धचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात
By admin | Published: March 5, 2016 03:54 AM2016-03-05T03:54:42+5:302016-03-05T03:54:42+5:30
देशभरात २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध (६० वर्षांपेक्षा अधिक) गुन्हेगारीच्या एकूण १८७१४ घटना घडल्या, ज्यात किमान ११०० ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला
नवी दिल्ली : देशभरात २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध (६० वर्षांपेक्षा अधिक) गुन्हेगारीच्या एकूण १८७१४ घटना घडल्या, ज्यात किमान ११०० ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर तेवढ्याच संख्येतील लोकांना गंभीर इजा पोहोचविण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांविरुद्धचे सर्वाधिक गुन्हे प्रगतिशील महाराष्ट्रातच घडत आहेत, ही अतिशय चिंतेची बाब आहे.
सामाजिक न्याय आणि रोजगार राज्यमंत्री विजय सांपला यांनी गुरुवारी राज्यसभेत दिलेल्या या माहितीच्या आधारावर हे सत्य उघड झाले आहे. खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांपला यांनी ही माहिती दिली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो राज्यांमधील अशा गुन्ह्यांची आकडेवारी ठेवते. परंतु ब्युरो ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध शहरी भागांमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांची वेगळी माहिती ठेवत नाही. तसेही पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था हा राज्यांच्या अंतर्गत येणार विषय आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे, गुन्ह्यांचा शोध घेणे, गुन्हा नोंदविणे, तपास आणि कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी राज्यांची आहे, असे सांपला यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि अन्य सुविधांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाने १९९२ पासून एकिकृत वृद्धजन योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत आश्रय, भोजन, वैद्यकीय सुविधा आणि मनोरंजन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याशिवाय राष्ट्रीय वृद्धजन धोरणाच्या (१९९९) शिफारशीनुसार आणि माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिक पालनपोषण कल्याण कायदा (२००७) अंतर्गत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी २०१०-११ दरम्यान राष्ट्रीय वृद्धजन देखभाल कार्यक्रम सुरू केला होता, अशी माहिती सांपला यांनी दिली.
महाराष्ट्रातील परिस्थिती
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोद्वारा उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या अत्याचाराबाबतचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल करण्यात आले. या काळात १६७ वृद्धांची हत्या करण्यात आली, ५२ ज्येष्ठ नागरिकांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला, ७ ज्येष्ठ नागरिकांची सहेतूक हत्या करण्यात आली, २४ ज्येष्ठ नागरिकांवर दरोडा घालण्यात आला, ६२३ ज्येष्ठ नागरिकांना लुटण्यात आले, ३०९ ज्येष्ठ नागरिकांना गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आली, ७ ज्येष्ठ नागरिकांना खंडणी मागण्यात आली, ६५४ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्यात आली, ९ वृद्ध महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि २१२९ ज्येष्ठ नागरिकांसोबत अन्य प्रकारचे गुन्हे करण्यात आले. अशाप्रकारे महाराष्ट्रात एकूण ३९८१ गुन्ह्यांची नोंद आहे.
मुंबई-९४४, नागपूर-१२२, नाशिक-९४, पुणे-२६७, व वसई-विरार-३६. एकूण गुन्हे १४६१.
गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण
मुंबई-२०९, नागपूर-१२०, नाशिक-९४, पुणे-२६७, वसई-विरार-३६. एकूण -३७९.